रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २८१ वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात पार पडली. कणकवलीचे प्रसिद्ध गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत गायनाने ही सभा रंगतदार झाली. (या गायनाची एक छोटी झलक शेवटी दिलेल्या व्हिडिओत पाहता येईल.)

कै. अन्नपूर्णाबाई (गोदूताई) अनंत जोगळेकर स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजर्या झालेल्या या मैफलीमध्ये सुरवातीला रत्नागिरीचे प्रसिद्ध संगीत शिक्षक विजय रानडे यांच्या हस्ते नटराज पूजन, दीप प्रज्वलन झाले. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक करून कलाकारांची ओळख करून दिली. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी कलाकारांना सन्मानपत्र दिले.
मैफलीची सुरवात श्री. मेस्त्री यांच्या भारदस्त स्वरांनी झाली. सुरवातीला त्यांनी विलंबित एकतालातील जोगकंस रागातील एक बंदिश आणि त्याला जोडून द्रुत तीन तालातील एक बंदिश आणि एक तराणा त्यांनी सादर केला. स्वरांचा भारदस्त व घोटीव लगाव, घुमावदार, स्वच्छ स्वर, कलेवरील आत्यंतिक प्रेम, विनम्रता यातून निर्माण झालेला स्वराविष्कार यामुळे सुरवतीपासूनच मैफलीत रंग भरला. त्यानंतर त्यांनी बिहागमधील ठुमरी, नंतर माझे जीवन गाणे, शब्दावाचून कळले सारे, निर्गुणी भजन, या भवनातील गीत पुराणे हे नाट्यगीत, विश्वाचा विश्राम रे यासारखी विविध प्रकारची गाणी म्हटली. शेवटी भैरवीतील पदाने त्यांनी आपल्या मैफलीचा शेवट केला.
मैफलीला तेवढीच उठावदार आणि दमदार साथसंगत रामकृष्ण ऊर्फ प्रसाद करंबेळकर (तबला) आणि वरद सोहनी (हार्मोनियम) या कसलेल्या कलाकारांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
मैफल यशस्वी होण्यासाठी हेरंब जोगळेकर आणि कुटुंबीय, र. ए. सोसायटी, जांभेकर विद्यालय, संजू बर्वे, दिलीप केळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.