सावंतवाडी : येत्या ३१ मार्च रोजी शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथे एक दिवसाचे पहिले मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
मालवणी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा आहे. या भाषेत एक गोडवा आहे. या भाषेतील अनेक विनोद प्रसिद्ध आहेत. वस्त्रहरणसारखे नाटक मालवणी बोलीत लिहिले गेले आहे. मात्र प्रामुख्याने मालवणी बोलीतील कविता अधिक प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत. अन्य साहित्यप्रकार मालवणीमध्ये अपवादानेच आढळतात. पण मालवणी ही जिल्ह्याची महत्त्वाची बोली असल्यामुळे त्याविषयीचे विचारमंथन व्हावे, मालवणी बोलीचे संगोपन, संवर्धन आणि संशोधन करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय व्हावा, या दृष्टिकोनातून मालवणी बोलीचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. एक दिवसाचे प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या आजगाव (ता. सावंतवाडी) येथील प्रेरणा साहित्य कट्टा या संस्थेतर्फे शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहकार्याने हे संमेलन होणार आहे.
येत्या ३१ मार्च रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत हे संमेलन होणार आहे. अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, असे संमेलनाचे स्वरूप असेल. संमेलनाचा अधिक तपशील येत्या एक मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर (9403088802) यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

