Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांना श्रीकांत गोवंडे साहित्य पुरस्कार प्रदान

Advertisements

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे आदर्श शिक्षक श्रीकांत गोवंडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांना चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देवधर यांनी ५६ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना तिचे महत्त्व पटावे, जनजागृती व्हावी, मराठीचा प्रसार आणि प्रचार योग्य उपक्रमांतून पार पडावा यासाठी शासकीय स्तरावरून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची अंमलबजावणी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, कोकण मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भाषासंवर्धनाकरिता काही उपक्रम घेण्यात आले. त्यातील एक उपक्रम म्हणजे खुल्या गटातील स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आणि दुसरी पुस्तक परीक्षण म्हणजे मला आवडलेले पुस्तक याविषयी थोडक्यात परीक्षण परिचय असा होता. या दोन्ही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचे परीक्षण कवी  शाहीर प्रदीप मोहिते, शिवाजी शिंदे आणि कवी लेखक रवींद्र गुरव यांनी केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले.

गोवंडे सरांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोवंडे सरांच्या कार्याची केतकर सरांनी दिली, तर स्मिता देवधर यांचा परिचय मनीषा दामले यांनी करून दिला. कार्यक्रमाला लोटिसमाचे समन्वय इतिहास अभ्यासक व  मराठी भाषा समितीचे सदस्य प्रकाश देशपांडे, चिपळूण कोमसाप अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे, कै. गोवंडे सरांच्या परिवारातील श्री. व सौ. मनीष चितळे, जिल्हा प्रतिनिधी कवी राष्ट्रपाल सावंत, माजी अध्यक्ष बोलीभाषा अभ्यासक कवी अरुण इंगवले, मसापचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लोटिस्मा कार्यवाह विनायक ओक, संचालक सुनील खेडेकर, मधुसूदन केतकर, चिपळूणमधील साहित्यप्रेमी, स्पर्धक आणि परीक्षक उपस्थित होते.

काव्य स्पर्धेत मेधा लोवलेकर, विद्या तांबे, पल्लवी भावे यांनी पहिले तीन क्रमांक, तर उत्तेजनार्थ क्रमांक अपर्णा नातू, नेहा सोमण, पूनम बुरटे यांना देण्यात आले. मला आवडलेले पुस्तक स्पर्धेत विशाखा चितळे, मेधा लोवलेकर आणि संगीता जोशी यांनी पहिली तीन क्रमांक, त उत्तेजनार्थ क्रमांक अपर्णा नातू, प्रकाश उनकले, वीणा गोगटे यांना देण्यात आले. विजेत्ंना सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालय, कोमसाप तसेच मसापची आजी-माजी कार्यकारणी  अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे, प्रा. संतोष गोनबरे, प्रा. अंजली बर्वे, प्राची जोशी, कवी अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंतयांनी परिश्रम घेतले. स्वागत, सूत्रसंचालन  मनीषा दामले यांनी केले, तर विनायक ओक यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version