ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झाले. समाजवादी विचारवंत प्रा. विनायक होमकळस यांनी प्रकाशन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामवंत कवी-समीक्षक अरुण इंगवले यांनी केले. मान्यवरांनी यावेळी देवधर यांच्या लेखनातील समाजभान, सत्यघटनांचे वर्णन, सातत्य आदींचे महत्त्व सांगितले. प्रा. अंजली बर्वे यांनी ‘काव्यसुमनांजली’मधील काव्याचे वैविध्य, अर्थ आणि भावसौंदर्य सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात देवधर यांच्या परदेशी एकांकिकेतील प्रवेश, सुंदर माझं घर ही नाटुकली सादर करण्यात आली. देवधर यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा पोवाडा शाहीर शिवाजी शिंदे यांनी सादर केला. विद्या तांबे, नीता तांबे, सुनेत्रा आपटे, प्रा. संगीता जोशी, अपर्णा नातू यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यानिमित्ताने देवधर यांची मुलाखत कीर्तनकार अंजली साने आणि स्नेहवर्धिनी मंडळाच्या कार्यवाह नेहा सोमण यांनी घेतली. या कार्यक्रमात देवधर यांची राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे, काव्यसुमनांजली ही तीन पुस्तके प्रकाशित झाली.

पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ लेखक प्रकाश जाधव, कोमसापच्या चिपळूणच्या अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे, मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कोवॅस संस्थापिका सुमती जांभेकर, डॉ. मीनल थत्ते, सुनील खेडेकर, अभिजित देशमाने, कैसर देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply