डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल – जोशी

चिपळूण : समाजाशी एकरूप झालेले साहित्यिक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. तानाजीराव चोरगे महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रा. जोशी यांच्या हस्ते चोरगे सरांना स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट आणि पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने कृषिभूषण साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांचा त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी प्रा. जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सौ. अंजली तानाजीराव चोरगे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव होते.

प्रा. जोशी म्हणाले, डॉ. चोरगे बहुमुखी प्रतिभावंत आहेत. त्यांनी ज्याला ज्याला स्पर्श केला, त्याचे सोने झाले आहे. आज साहित्यिक आपल्याच कोषात जगत आहेत. त्यांचा समाजाशी संबंध राहिलेला नाही. असे चित्र दिसत असताना मातीचा स्पर्श झालेले चोरगे सरांचे व्यक्तिमत्त्व आहे. साहित्यिकाला समाजासाठी काहीतरी करावे लागते. हा आदर्श वस्तुपाठ मोठमोठ्या लेखकांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. साहित्यिकांनी समाजाला योगदान करण्याची ही परंपरा खंडित होता कामा नये. चोरगे सर उत्तम खेळाडू आहेत. आज साहित्यिकांमध्ये खिलाडूवृत्तीही कमी झालेली आहे. दुसऱ्याचे कौतुक करण्यासाठी आवश्यक असलेली निकोपता आपल्याकडे दिसत नाही. चोरगे सर साहित्य परिषदेवर आल्याने ही खिलाडूवृत्ती साहित्यिकांमध्ये वाढेल. महाराष्ट्राने कोकणाला डॉ. तानाजीराव चोरगे आणि प्रकाश देशपांडे ही अमूल्य भेट दिली आहे.

प्रकाश पायगुडे म्हणाले, चिपळूणच्या संस्थेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर एक अध्यक्ष वगळता इतर कोणीही बसलेले आम्हाला दिसत नाही. हा आदर्श आम्ही घ्यायला हवा आहे. डॉ. तानाजीराव चोरगे सरांचा आणि माझा परिचय १९९४ पासूनचा आहे, असे सांगून बोलण्यात आणि लेखनात प्रसंग रंगवून सांगण्याच्या चोरगे सरांच्या पद्धतीचे पायगुडे यांनी कौतुक केले. ‘मी स्कॉलर नव्हतो, पण प्रयत्न खूप करत होतो.’ या ‘झेप’ चरित्रातील वाक्यावर पायगुडे यांनी सरांच्या ठायी असलेल्या नम्रपणाबाबत विशेष टिप्पणी केली. ‘सदा सर्वकाळ हसायचे आणि दुसऱ्याला हसवायचे, हाही सरांचा गुण अतिशय महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. ‘कृषिभूषण’ चोरगे सर लवकरच ‘महाराष्ट्र भूषण’ ठरोत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस वाचन मंदिराचे उपाध्यक्ष शाहीर राष्ट्रपाल सावंत यांनी ‘कोकण कृषी शिक्षण संस्था, नावारूपास आलिया आता’ हे चोरगे सरांवर लिहिलेले गीत सादर केले. प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते डॉ. तानाजीराव चोरगे तर कोमसापच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्ष डॉ. रेखा देशपांडे यांच्या हस्ते सौ. अंजली चोरगे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. चोरगे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. यतीन जाधव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे चोरगे सरांना स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट आणि पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनाला वाळवा येथील शशिकांत बाळासाहेब शेळके यांच्याकडून कुलदीप पोतदार यांच्या कुंचल्यातून साकारलेले डॉ. तानाजीराव चोरगे तैलचित्र यावेळी भेट देण्यात आले. वाचनालयाच्या वतीने चित्रकार कुलदीप पोतदार तर मांडकी-पालवण येथील डॉ. चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे डॉ. चोरगे यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्रकाश देशपांडे, कुलदीप पोतदार, शशिकांत शेळके आदींचा सन्मान करण्यात आला.

मृदंगी त्रैमासिकाच्या ‘डॉ. तानाजीराव चोरगे’ विशेषांकाचे प्रकाशन करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. तानाजीराव चोरगे, सौ. अंजली चोरगे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि ‘मृदंगी’चे कार्यकारी संपादक अरुण इंगवले.

मान्यवरांच्या हस्ते मृदंगी त्रैमासिकाच्या ‘डॉ. तानाजीराव चोरगे’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मृदंगी’चे कार्यकारी संपादक आणि नामवंत कवी-समीक्षक अरुण इंगवले यांनी सांगितले की, साहित्याच्या अंगाने समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वाचनालयाचे हे कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रेरणेने सुरू असलेले मृदंगी हे मुखपत्र आहे. गेल्या सहा वर्षांतील मृदंगी त्रैमासिकाने एखाद्या साहित्यिकावर केलेला हा पहिलाच विशेषांक आहे. वाचन चळवळीबद्दल अतिशय आस्था असलेल्या चोरगे सरांच्या दर्यादिलीबद्दलचे किस्से त्यांनी यावेळी सांगितले. आधुनिक काळातील विसंगती समोर आणणाऱ्या ‘माकडहाड डॉट कॉम’सारख्या कथासंग्रहाचे लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, चोरगे सर हे कोकण भूमीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. कोकणला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात आजवर चोरगे सरांनी केलेल्या लेखन कार्याला मिळालेली ही मान्यता अभिमानास्पद आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. तानाजीराव चोरगे

डॉ. चोरगे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, खेळ वगळता नाट्य आणि लेखन हा माझा भाग कधीही नव्हता. नाट्य आणि लेखनाकडे मी वळलो तेव्हा मला ओळखणारे अनेक चेहरे माझ्याकडे प्रश्नार्थक पद्धतीने बघायचे. दापोलीला कृषी विद्यापीठात प्राध्यापक असताना मी नाट्य आणि लेखन प्रांताकडे वळलो. चोरगे यांनी यावेळी आपल्या भाषणात आपल्या विविध पुस्तकांचे, सत्यकथेवर आधारित कादंबऱ्यांचे ‘कथाबीज’ उपस्थितांसमोर मांडले. पुस्तकांचे विषय ग्रामीण असल्याचे ते म्हणाले. पहिले पुस्तक प्रकाशित करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. दिलीपराज प्रकाशन संस्थेचे प्रकाशक राजीव बर्वेंची भेट झाल्यावर आपली पुस्तके त्यांच्याकडून प्रकाशित होऊ लागली. त्यांनीच आपल्याला लेखक तर प्रकाश देशपांडे यांनी आपल्याला साहित्यिक केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. चोरगे यांनी केला. साहित्य निर्मिती ही समाजप्रबोधनासाठी, समाजसुधारणेसाठी आहे. साहित्याचा समाज सुधारणेवर परिणाम झाला आहे का, साहित्यिक तरी सुधारले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिक्षकी पेशातील लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची, वाचन करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. आत्ताच्या पिढीला दोष देताना आपण कसे आहोत, आजच्या पिढीसमोर आदर्श कोण आहेत, हेही अंतर्मुख होऊन तपासायला हवे असल्याचे ते म्हणाले. गेली १५ वर्षे मी बँकेत काम करतो. बँकेच्या परीक्षेत नापास झालेल्या माणसाने तीन वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्याने बुडालेली जिल्हा बँक सक्षम बनवली. सत्य आणि नीतिमत्ता नीट ठेवून काम केले, तर अवघड काही नाही, हे आपण समजून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले, तर आभार अंजली बर्वे यांनी मानले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनाला शशिकांत बाळासाहेब शेळके यांनी कुलदीप पोतदार यांच्या कुंचल्यातून साकारलेले डॉ. तानाजीराव चोरगे यांचे तैलचित्र भेट दिले.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply