रत्नागिरी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खेडशी (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात आज (२८ फेब्रुवारी) प्रश्नमंजूषा, हस्ताक्षर, चित्रकला, रंगभरण आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये पंचक्रोशीतील विविध गावांमधील शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांच्या प्रारूपांचे प्रदर्शनही या वेळी भरवण्यात आले होते. शाळेच्या परिसरात वैज्ञानिक विषयांवरच्या आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेद्वारे ‘नासा’च्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या सना होरंबे आणि लावण्या पवार या पानवल गावातील दोन विद्यार्थिनींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. होमी भाभा यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व सांगून मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळा आणि पालकांनी आवर्जून या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना पाठवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
(साप्ताहिक कोकण मीडियाला फॉलो करा.)
व्हॉट्सअॅप चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i
टेलिग्राम : https://t.me/kokanmedia
गुगल न्यूज : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLaNmwsw-pezAw
यू-ट्यूब : https://www.youtube.com/kokanmediaratnagiri

