रत्नागिरी : येथील रोटरी क्लबतर्फे शिक्षकदिनानिमित्त सहा शिक्षकांचा सन्मान आज करण्यात आला. दहावीच्या ५३ विद्यार्थ्यांना एज्युकेशनल ॲपचे वितरणही करण्यात आले. खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालयात हा कार्यक्रम झाला.
शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे सन्मानित करण्यात आलेले शिक्षक असे – गौरी विजय करमरकर (जिल्हा परिषद शाळा, कारवांचीवाडी), रेवती विजय वैद्य (जिल्हा परिषद शाळा, बसणी), मानसी नितीन मोने (जिल्हा परिषद शाळा, वेतोशी), अपूर्वा जयेश काळोखे (केंद्रशाळा, डावखोल), महेंद्र शांताराम शिंदे (महालक्ष्मी विद्यालय, खेडशी), ज्योती उदय डोंगरे (जिल्हा परिषद शाळा, कासारवेली).
रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय पवार पवार यांनी रोटरी क्लबच्या ॲपची माहिती दिली. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त करताना अनेक दानशूर व्यक्तींनी त्यासाठी क्लबला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रप्रमुख अमर घाडगे यांनी मनोगतात शिक्षकांकरिता रोटरी क्लब करत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यापुढे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महालक्ष्मी विद्यालय संस्थेचे प्रताप सावंतदेसाई यांनी सांगितले की, शिक्षकांबाबत रोटरी क्लबचे योगदान अनमोल आहे. शिक्षकांचे काम अधिक प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्योती डोंगरे आणि गौरी करमरकर यांनी रोटरी क्लबबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कारांमुळे काम करायला अधिक बळ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. गुरुस्थानी असलेल्या शिक्षकांना वंदन करून विनम्रतापूर्वक पुरस्कार स्वीकारत करत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकार्यांरचेही यासाठी आभार मानले.
सचिन सारोळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षकांचा सन्मान करण्याचे कार्य यापुढील काळातही केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आयडियल स्टडी ॲपचे वितरण तालुक्यातील बहुतांशी शाळेतल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा रोटरी क्लबचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. सचिव जयेश काळोखे यांनी यावेळी आवाहन केले की, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य करावे. प्रतापराव सावंतदेसाई यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ॲपच्या खर्चाचा भार स्वीकारला. त्याबद्दल रोटरी क्लबने त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाला राजेंद्र घाग, दिलीप रेडकर, राजेंद्र काळे, विनायक हातखंबकर, मुख्याध्यापक श्री. देसाई, सुभाष पाटील आणि इतर शिक्षक उपस्थित होते. सुभाष पाटील आणि महेंद्र शिंदे यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Nice coverage sir 🙏