Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकणातील शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करून शेतीत विविधता आणावी आणि ती वाढवावी : डॉ. उदय सामंत

Advertisements

रत्नागिरी : ‘रत्नागिरीच्या हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. त्याचप्रमाणे कोकणात काजू उत्पादनातूनही ब्राझीलप्रमाणे क्रांती होऊ शकते. नोकरीच्या तुलनेत शेतीतून दसपट अधिक पैसे मिळू शकतात; मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करून शेती वाढवली पाहिजे. शेतीत विविधता आणली पाहिजे. भात, नाचणीबरोबरच फळबागा लागवड क्षेत्र वाढवलं पाहिजे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,’ असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं. रत्नागिरीत सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाअंतर्गत भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या सप्ताहाचा आज (१२ मे) समारोप होत आहे. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत प्रयोगशील आणि विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. (प्रदर्शनाचे व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

‘शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नावर कर नाही. तसंच, शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्या योजनांचा फायदा घेऊन शेती करायला हवी. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही,’ असंही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

फलोत्पादन मंत्री गोगावले म्हणाले, ‘फळबागा लागवडीसाठी पूर्वीची शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना सुरू करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. दर्जेदार बियाणं, खतं शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. फळबाग लागवडीसाठीचं यंदाचं १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावं. त्यामुळे मुंबईत होणारं स्थलांतर थांबू शकेल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तयार करावं. काय केल्यावर काय होतं, याची माहिती द्यावी. बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये अनुदान दिलं जातं. शिवाय त्याची विक्री टनावर होते. त्यावरच्या प्रक्रिया उद्योगातून मोठा रोजगार आणि उत्पन्न मिळतं. शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं करत आहोत. शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय वाढवावा.’

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, ‘शेती हा व्यवसाय विकसित होत आहे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग शेती हा मोठा व्यवसाय करण्यासाठी करावा. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करावी. अ‍ॅग्रीस्टॅकदेखील पूर्ण करावं. शेतीपूरक व्यवसाय वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामं पूर्ण करावीत. पाणी अडवण्याची मोहीमही राबवावी.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version