
दापोली : दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३वा पदवीदान समारंभ आज (१४ मे २०२५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदवीचा, घेतलेल्या ज्ञानाचा आणि केलेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांना लाभ करून द्यावा. देशाच्या कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा,’ असे आवाहन राज्यपाल राधाकृष्णन यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले. कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा शेती, तसेच पशुधन शेती पद्धतीतल्या संधींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री कोकाटे यांनी केले. कोकणामध्ये भातशेतीला पर्याय नसला, तरी वरकस जमिनीत पेरभात पद्धतीचा वापर करून भातशेतीतून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करता येईल का, यावर संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ नोकरीच्या मागे न धावता शेतीत उतरा, तसेच शेतीपूरक व्यवसाय करा, असे आवाहनही त्यांनी केले. (फोटो बातमीच्या शेवटी)
या समारंभाला कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृह-राज्यमंत्री योगेश कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पीएचडी मिळवलेल्या, तसेच सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून दिली आहे, असे गौरवोद्गारही राज्यपालांनी या वेळी काढले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

कितीही मोठे झाल्यावरही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना, विद्यापीठाला विसरू नये आणि आपल्या शिक्षणाचा देशाला, राज्याला कसा फायदा होईल, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले. इंग्रज भारतातून निघून गेले असले, तरी पदवीदान समारंभाला गाउन घालण्याची पद्धत अजून आहे. या पेहरावाऐवजी या समारंभाला पारंपरिक पेहराव मिळण्याच्या दृष्टीने कोकण कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. आपण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठांना स्वायत्तता दिल्याने मराठमोळा पेहराव पुढे आला आहे, असेही डॉ. सामंत म्हणाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे मनोगत
विद्यापीठाची महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेती, फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले आहे. येथे विकसित केलेल्या तांदळाच्या जातींनी कोकण प्रदेशात उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. विद्यापीठाच्या कलम आणि उत्पादन तंत्रांमुळे या प्रदेशात आंबा लागवडीचा विस्तार झाला आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या उच्च उत्पादन देणाऱ्या काजू जातींची लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. कोकण कन्याळ ही शेळीची जात आणि कोकण कपिला ही गायीची जात ही दोन्ही भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय शाश्वततेवर आधारित संशोधनाची उदाहरणे आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भारत शाश्वत मत्स्यपालनाच्या दिशेने प्रगती करत आहे. विद्यापीठे आणि संशोधन संस्था नवोपक्रम आणि ज्ञान निर्मितीची इंजिन्स आहेत. नवीन ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राची स्थापना आणि भारत आणि परदेशातील शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्याने भविष्यातील तयारी आणि जागतिक सहकार्यासाठी विद्यापीठाची वचनबद्धता आणखी दृढ होते. तुम्ही एका अभिमानास्पद वारशाचे वारसदार म्हणून जगात पाऊल ठेवत आहात. तुम्ही तुमचा मार्ग आखत असताना तुमचे प्रयत्न अनेकांचे विशेषतः समाजाच्या शेवटच्या घटकांचे जीवन घडवतील. तुमच्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी अधिकाधिक करा.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मनोगत
या विद्यापीठाची परंपरा उज्ज्वल आहे. या विद्यापीठाने अनेक राजकीय नेते, अनेक अधिकारी आणि उद्योजक घडविले आहेत. क्लायमेट स्मार्ट शेतीसाठी युद्धपातळीवर संशोधन आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बदलत्या वातावरणात तग धरून राहणारे अधिक उत्पादनक्षम वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा शेती, तसेच पशुधन शेती पद्धतीतील संधींचा शोध घेणे या गोष्टीही आवश्यक आहेत. कोकणामध्ये भातशेतीला पर्याय नाही, हे खरे असले तरी वरकस जमिनीमध्ये पेरभात पद्धतीचा वापर करून भातशेतीतील कार्बन उत्सर्जन कमी करता येईल का, यावर संशोधन होणे आवश्यक वाटते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बनचे प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळविणे, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव ओळखणे, पिकावरील जैविक, अजैविक ताण ओळखणे या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात येणार आहेत. कोकणातील जवळजवळ ३.५ लाख हेक्टर क्षेत्र हे आंबा, काजू आणि इतर फळ पिकांखाली आहे. काजू या पिकांमध्ये सखोल संशोधन केलेले आहे. विद्यापीठात ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. त्याचे पूर्ण प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षित तरुण-तरुणी आले, तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईलच. त्याचबरोबर तरुणांना व्यवसायाची संधी प्राप्त होईल. हापूस आंबा तर कोकणाची शान आहे; मात्र मागील वर्षी फुलकिड्यांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. निसर्गात हे सगळे अचानक घडत असते; मात्र विद्यापीठांनी अगोदरच या गोष्टींचा विचार करून शिक्षण, संशोधन आणि शेतकऱ्यांना विस्तार कार्यामार्फत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने भाताच्या ३५ जाती विकसित केलेल्या आहेत आणि ३.५ लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली जाते. यातील रत्नागिरी ८ या जातीला देशामध्ये खूप मागणी आहे. तरुण वर्गाला शेतीकडे वळवायचे असेल, तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही हे शास्त्रज्ञांनी ध्यानात घेतले पाहिजे. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे संशोधन पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ नोकरीच्या मागे धावू नका. शेतीत उतरा, शेतीपूरक व्यवसाय करा. शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगाला खूप संधी आहे. आपल्या या शिक्षणाचा फायदा सामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा तरुण-तरुणींवर आहे. आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आणि प्रगत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपले नक्कीच योगदान असेल, याची मला खात्री वाटते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड








