२०३५नंतर देशात वाढतील वयस्कर व्यक्ती; त्यांच्या समस्या आणि उपायांवर आताच करायला हवा विचार : मुख्यमंत्री फडणवीस

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावात ‘हॅबिटॅट फॉर ह्युमन फाउंडेशन’तर्फे उभारण्यात आलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन आज (१५ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, आशिष शेलार, प्रसाद लाड, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, पद्मश्री दादा इदाते, डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, वृद्धाश्रम उभारणारे डॉ. जलील परकार आणि श्रीमती शगुफ्ता परकार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘भारत हा आज युवा देश म्हणून ओळखला जातो. सरासरी आयुर्मान ५० वर्षांवरून ७२ वर्षांवर आले असून, ते ८५ वर्षांवर जाणार आहे. आज देशाचे ६० टक्के नागरिक २७ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत; मात्र लोकसंख्येची ही रचना दर वर्षी बदलत जाणार असून, २०३५नंतर आपल्या देशात वयस्कर व्यक्तींची संख्या दर वर्षी वाढत जाईल. म्हणून वयस्कर व्यक्तींच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना यांचा आपल्याला आताच विचार करावा लागेल. या पार्श्वभूमीवर डॉ. जलील परकार यांच्यासारखे निष्णात डॉक्टर पुढे येऊन अशा सुंदर वृद्धाश्रमाची व्यवस्था उभी करतात, ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. समाजात असे काम करणारी मंडळी आहेत, म्हणूनच आपला समाज योग्य प्रकारे चालतो,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी काढले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

‘पूर्वी कुटुंबव्यवस्था शक्तिशाली असल्याने भारतात वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती; मात्र आता कुटुंबे लहान झाली, ओलावाही कमी झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमांची गरज भासू लागली. परंतु, समाजच एखादे आव्हान उभे करतो, तेव्हा समाजातीलच कोणी तरी पुढे येऊन त्या आव्हानाशी सामना करतो. डॉ. जलील परकार यांनीही आपल्या कार्यातून ते केले आहे. डॉक्टर कसा असावा, हे त्यांनी कायमच आणि कोविड काळात स्वतः गंभीर आजारी असतानाही दाखवून दिले आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘या वृद्धाश्रमाची गणना महाराष्ट्रातील पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमांत करू शकतो. इथला परिसर सुंदर आहे. इथे येणाऱ्या वृद्धांसोबत कुटुंब नसले, तरी इथे निसर्गसौंदर्य आहे. शांतता आहे; पण एकटेपणा नाही. हा वृद्धाश्रम आहे; पण निराशा नाही. इथे आशेचे वातावरण आहे. इथे फळबागा, फुलझाडे वाढवण्यात आली आहेत. नदी आहे. वृद्धांना येथे मानसिक शांती मिळेल. तसेच, या निसर्गामुळे येथील वृद्धांचे आयुष्य पाच-दहा वर्षांनी वाढेल,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘सरकारकडून कोणतीही मदत न मागता तुम्ही हे सारे उभे केले; पण भविष्यात कधी मदत लागली, तर हक्काने सांगावे. आम्हीही या चांगल्या कामासाठी फूल ना फुलाची पाकळी नक्कीच मदत करू,’ अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यमंत्री कदम म्हणाले, ‘वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात. आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहेत, तिथे आजही जवळपास ४८पेक्षाही जास्त वृद्ध आहेत. काही वेळेला इतकी वाईट परिस्थिती येते, की त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा अग्नी द्यायलादेखील कुटुंबातील कोणी येत नाही. डॉक्टर जलिल परकार यांनी माझ्या मतदारसंघांमध्ये वृद्धाश्रम सुरू करून वृद्धांना आधार दिलेला आहे.’
खासदार तटकरे म्हणाले, ‘डॉ. परकार यांनी उत्तम पद्धतीने उभारलेल्या सगळ्या रूम पाहून येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या हक्काच्या घरामध्ये आल्यासारखे वाटेल. प्रदूषणविरहित निसर्गरम्य वातावरण अतिशय उत्तम प्रकारे कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडे आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचे आयुष्य वाढेल.’

डॉ. जलील परकार

‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर कोविड काळ आला. कोविडमध्ये त्यांनी पुष्कळ मदत केली. त्यानंतर जागा घेऊन हा वृद्धाश्रम उभा करायला मला तीन वर्षे लागली. या कामासाठी मदत केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे,’ अशा भावना डॉ. जलील परकार यांनी व्यक्त केल्या. भाई जगताप यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply