सदानंद झो आणि हर्ष नकाशे ठरले यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी

वालावल : प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या चौथ्या स्मृतिदिनी (१३ मे २०२५) वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. सदानंद झो आणि हर्ष नकाशे यांची यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार वितरण सोहळा दर वर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला होणार आहे.

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०१९ साली डॉ. अशोक प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धेची सुरुवात केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून आता त्यांच्या स्मृतिदिनी (१३ मे) ही स्पर्धा वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित केली जाते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

२०१९ साली या स्पर्धेचे स्वरूप अभंग व भक्तिगीत गायन असे ठेवण्यात आले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा जगभरातील संगीताचा पाया मानला जातो. त्यामुळे २०२२ साली या स्पर्धेचे स्वरूप बदलून ही स्पर्धा फक्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी खुली करण्यात आली. पहिली दोन वर्षे ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित होती. परंतु मागील वर्षी ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्य या दोन विभागांसाठीही खुली करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि गोवा या विभागातून या वर्षी दोन गटांतून एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी १४ स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेऊन सादरीकरण केले.

सदानंद झो

यंदा लहान गटातून कु. सदानंद झो आणि मोठ्या गटातून कु. हर्ष नकाशे यांनी ही स्पर्धा जिंकून स्वरसिंधुरत्न किताब प्राप्त केला. लहान गटात एकूण १०, तर मोठ्या गटात चार स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप धोंड आणि मधुवंती पेठे यांनी केले. मधुवंती पेठे यांनी स्पर्धेचे परीक्षण झाल्यानंतर उपस्थितांना स्पर्धेतील सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान गटातून कु. सार्था गवाणकर आणि मोठ्या गटातून कु. श्रुती सावंत या दोन स्पर्धकांच्या सादरीकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना सिद्धेश कुंटे, मंगेश मेस्त्री यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे आयोजन श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल आणि श्री देव लक्ष्मीनारायण भक्त यांनी केले होते. प्राचार्य प्रशांत धोंड यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

कोकणातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालावलच्या श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या सभामंडपात आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच सहा जुलै २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता स्वरसिंधुरत्न २०२५ या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्वरसिंधुरत्न पुरस्कार विजेते आपली गायनसेवा सादर करणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रवणानंद घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रशांत धोंड यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply