रत्नागिरी : महिला प्रभागसंघांतर्फे चालवल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुसऱ्या हाउसबोटीचं लोकार्पण आज (१८ मे) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या जांभारी बंदरात झालं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’अंतर्गत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाला सिंधुरत्न समृद्ध योजनेतून अर्थसाह्य देण्यात आलं आहे. वाटद प्रभागसंघातर्फे ही हाउसबोट चालवली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात राई बंदरात पहिल्या हाउसबोटीचं लोकार्पण झालं होतं.
‘महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं. त्याकरिता त्यांना ताकद देण्यासाठी मी सोबत असेन, असं वचन मी दिलं होतं. त्याची वचनपूर्ती करणारा आजचा दिवस आहे. एक कोटीची बोट महिला बचत गटातर्फे चालवली जाणार आहे. हा देशातला आदर्शवत प्रकल्प आहे. महिला सक्षमपणे काम करत आहेत. त्याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. केरळपेक्षा चांगल्या पद्धतीचं हाउस बोट टर्मिनल भाट्ये पूल इथे तयार करू. पुढच्या दोन वर्षांत महिलांच्या हाती १० हाउसबोटी असतील. त्या फक्त महिला चालवतील,’ असं प्रतिपादन पालकमंत्री सामंत यांनी या वेळी केलं.
‘पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे लागेल. महिला भगिनींनी पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक दिली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटांचं काम सक्षमपणे करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. रत्नागिरीत नव्याने झालेल्या बसस्थानकामध्ये बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल उभारला जाईल. देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. युद्धसदृश परिस्थितीची माहिती दोन महिला अधिकारी जगाला देत होत्या. त्यातही सोफिया कुरेशी यांच्यासारखी महिला नेतृत्व करते, हा आपला सर्वांचा अभिमान आहे,’ असंही पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी चेतन शेळके, बाबू म्हाप, सरपंच आदेश पावरी आदी मान्यवर, तसंच महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी हाउसबोट जांभारी बंदरात
Advertisements

