महिला बचत गटांचे राज्यातील पहिले विक्री केंद्र रत्नागिरीत

रत्नागिरी : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचे राज्यातील पहिले विक्री केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी केले.

येथील आठवडा बाजारात रत्नागिरी शहर महिला बचतगट विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन केल्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला भगिनी, तरुण आणि ज्येष्ठांचा विकास झाला, तर तोच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास ही भावना ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील पहिले बचत गटांचे विक्री केंद्र रत्नागिरीत होत आहे, याचा मला अभिमान आहे. त्यासाठी ९ कोटी ३ लाख रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला दिला आहे. आता बचत गटांनी एवढे चांगले काम करावे, की सारा महाराष्ट्र टाळ्या वाजवेल. बचतगटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवावा. वीस कोटीचे भवन बांधण्याची माझी तयारी आहे.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय चांगली बाजारपेठ बचतगटांच्या उत्पादनांना मिळू शकते. तो शब्द आज भूमिपूजनाने पूर्ण करीत आहे. या भवनामध्ये एका वेळी ४०० महिलांना प्रशिक्षण देता येऊ शकेल, असे सभागृह असणार आहे. सीआरपींचे मानधन ६ हजार केले आहे. येत्या ३० तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन हजार ४४३ महिलांना मोबाइल वाटप करण्यात येणार आहे. दिलेले आश्वासन प्रमाणिकपणे पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुढच्या महिन्यात ५०० महिलांना केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर पथदर्शी प्रकल्प रत्नागिरीत सुरू करून क्वायर बोर्डाचे कार्यालय सुरू करण्यात येईल. जिल्ह्यातील पहिले पाच बचतगट पुढच्या वर्षी दिल्लीच्या दालनात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात नेण्याची जबाबदारी माझी असेल. अजूनही काही वेगळ करता येईल का, याबाबतही माझा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी माविमतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात बचत गटांना धनादेश देण्यात आले. त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले.

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, शिल्पाताई सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, कांचनताई नार्वेकर, माजी नगरसेविका शीतल पावसकर, माजी नगरसेवक रोशन फाळके आदी उपस्थित होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply