विद्यार्थ्यांनी आत्मीयतेचा अभ्यास करावा : डॉ. सोनाली कदम

रत्नागिरी : मानवी जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आत्मीयतेतून होते. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबिर चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. सोनाली कदम यांनी प्रज्ञा परिसर प्रकल्प या विषयांतर्गत एक कार्यशाळा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिबिरार्थींशी संवादात्मक चर्चेतून आपले महाविद्यालय, आपण राहत असलेले शहर, आपला देश याबद्दल ममत्व, तेथील सगळ्या नागरिकांविषयीची आत्मीयता कशी वाढवता येईल, याविषयीचे महत्त्व त्यांनी स्वयंसेवकांना अवगत करून दिले. या कार्यशाळेचाच एक भाग म्हणून स्वयंसेवकांच्या गटांमधून त्यांना विविध उपक्रम देऊन त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा, गरजा, त्यावरील संभाव्य उपाय आणि हे उपाय करायचे ठरवले तर स्वयंसेवक त्यात कसे योगदान करू शकतील, याचाही आढावा घेण्यात आला.

शिक्षक-विद्यार्थी सहसंबंध दृढ करणे, विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण आनंदाने घेता यावे, महाविद्यालयातील शिस्त, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा असणाऱ्या वैयक्तिक समस्या जाणून घेणे, आपला सांस्कृतिक विभाग, आपला जिमखाना विभाग असे विविध विषय मुलांना चर्चेसाठी दिलेले होते. शिबिरार्थींनी आपापल्या गटात अतिशय उत्तम चर्चा करून विविध उपाय आणि त्यांचा त्यातील सहभाग याबद्दल सादरीकरण केले. चर्चात्मक कार्यशाळा स्वयंसेवकांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अतिशय यशस्वी झाली. कार्यशाळेत प्रा. परेश गुरव यांनी सहकार्य केले.

चांद्रयान मोहीम म्हणजे भारताची नेतृत्व मोहीम : प्रा. बाबा सुतार
शिबिरातील आणखी एका सत्रात खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक सुतार यांनी चांद्रयान मोहिमेविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. सोबत ग्रहताऱ्यांचे दर्शन घडविले. प्रा. सुतार यांनी भारताची खगोल मोहीम या विषयावर संपूर्ण कोकणात व्याख्याने दिली आहेत. एनएसएस शिबिरामध्ये सर्व स्वयंसेवकांकरिता आकाशदर्शन या विषयाची सखोल माहिती त्यानी दिली. चांद्रयान मोहिमेची वैशिष्ट्ये सांगितली. चांद्रयान मोहीम या भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. गनी यांनी प्रा. सुतार सर यांना सन्मानचिन्ह देऊन आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply