रत्नागिरीच्या एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील मुख्य बसस्थानकाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी (११ मे) राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला. १९५८ साली उभारलेल्या या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम २०१४पासून विविध कारणांमुळे रखडलं होतं; मात्र उद्योगमंत्री सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतून दीड वर्षापूर्वी नवं बसस्थानक उभारण्याचं काम सुरू झालं आणि आज त्याचं लोकार्पण झालं. (फोटो, व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांतीकक्ष, वातानुकूलित हिरकणी कक्षासह सुसज्ज असं हे राज्यातलं वैशिष्ट्यपूर्ण बसस्थानक ठरणार असून, त्याची स्वच्छता राखणं, ते नीटनेटकं ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे, असं आवाहन डॉ. सामंत यांनी केलं. ग्रामीण भागांना जोडणारी लाल परी आपली आहे, या भावनेने बसस्थानक हे आपलं घर आहे असं समजून त्याची स्वच्छता राखावी, असं ते म्हणाले. या नव्या बसस्थानकामध्ये कोकणी उत्पादनांच्या विक्रीसाठी काही गाळे दिले जाणार असून, जुन्या बसस्थानकातल्या छोट्या व्यावसायिकांचाही विचार केला जाणार आहे, असं सामंत म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली स्थानकासाठीही निधी दिला जाईल, तसंच लांज्याच्या नव्या बसस्थानकाचं काम एका वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाहीदेखील पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिली. या बसस्थानकात ग्रामीण वाहतुकीसाठी १०, तर शहर वाहतुकीसाठी पाच फलाट आहेत. बसस्थानकाच्या आवारात संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर जाणं दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुलभ होण्याकरिता लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सामंत यांनी या वेळी सांगितलं. सामंत म्हणाले, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ५०० कोटी रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाला मिळाला. त्यातील ५० कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिले, असंही ते म्हणाले.
भरत गोगावले म्हणाले, उदय सामंत हे राज्याला लाभलेले विकासरत्न आहे. त्यांना रायगडच्या वतीनेही शुभेच्छा देतो. विकास कशा पद्धतीने करायचा, याचा प्रत्यय रत्नागिरीमध्ये आल्यावर येतोय. मिऱ्या नागपूर रस्ता, बंधारा आणि आता चांगलं सुंदर देखणं बसस्थानक झालं आहे. हे बसस्थानक स्वच्छ ठेवणं तुमचं काम आहे.
योगेश कदम म्हणाले, लोकप्रतिनिधी मतदारसंघाला कसा न्याय देऊ शकतो, हे आज पाहायला मिळाले. याचे श्रेय सामंत साहेबांना जाते. दापोली, खेड, मंडणगड येथील प्रशासकीय इमारती मंजूर करून घेतल्या आहेत. त्यासाठी १२० कोटींपेक्षा जास्त निधीला मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरी बसस्थानक हे राज्यात रोल मॉडेल म्हणून राबवण्यासारखे उभारले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या, तर त्यांची मानसिकता सकारात्मक बनते. चांगलं काम होतं. अशा इमारती प्रत्येक तालुक्यात होणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
फीत कापून, कोनशिला अनावरण करून बसस्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचं अनावरणही करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचंही पूजन करण्यात आलं. महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी प्रास्ताविक केलं. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर यांनी आभारप्रदर्शन केलं. सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply