विद्यार्थिनी आणि महिलांनी झाशीच्या राणीचा आदर्श घ्यावा : राजू नेवाळकर
Kokan Media
Advertisements
रत्नागिरी : ‘राणी लक्ष्मीबाईंनी १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात अफाट पराक्रम केला आणि शौर्य गाजवले. त्यांनी अवघ्या २२ वर्षांत मोठे कार्य केले. विद्यार्थिनी व महिलांनी राणीच्या पराक्रमाचा आदर्श घ्यावा. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ गेली दहा वर्षे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन झाशीच्या राणीची जयंती साजरी करत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेऊन राणीचे चरित्र पोहोचवत आहे, ही एक कौतुकाची बाब आहे,’ असे प्रतिपादन झाशीच्या राणीचे वंशज नंदकुमार तथा राजू नेवाळकर यांनी केले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.) रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त चांदोर (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा, हस्ताक्षर आणि वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण आज (१९ नोव्हेंबर) करण्यात आले. त्या वेळी नेवाळकर यांनी झाशीच्या राणीच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, की ‘चांदोर आणि कोट गावाची हद्द एक आहे. राणीचे माहेर तांबे घराण्यात असून, तिचा विवाह झाशीच्या गंगाधरभाऊ नेवाळकर यांच्याशी झाला. नेवाळकर कुटुंबीय देश-विदेशांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांची सातवी पिढी आज झांशीवाले असेही आडनाव जोडून लावते. नेवाळकरांच्या कुटुंबात माझा जन्म झाला, याचा अभिमान वाटतो.’ प्रास्ताविकामध्ये संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले, की ‘झाशीची राणी म्हणजे शौर्याचे प्रतीक आहे. हे शौर्य बालपणापासूनच मुलांमध्ये आले पाहिजे, याकरिता राणीचे चरित्र वाचले गेले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये झाशीच्या राणीची जयंती साजरी करण्याचा उपक्रम आम्ही गेली १० वर्षे करत आहोत. क्रीडा, कला वगैरे स्पर्धा शाळांमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि राणीचे चरित्र दिले जाते. कोटच्या सरपंच सौ. निशिगंधा नेवाळकर म्हणाल्या, की ‘कोट येथे झाशीच्या राणीचे स्मारक होणार आहे. त्या वेळी सर्वांनी तेथे जरूर भेट द्यावी. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी झाशीच्या राणीचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.’ राष्ट्रनिष्ठा आणि देश प्रथम या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे अॅड. प्रिया लोवलेकर यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला चांदोरच्या सरपंच पूनम मेस्त्री, कोटच्या सरपंच व राणीच्या घराण्यातील सौ. निशिगंधा नेवाळकर, शाळा समिती अध्यक्ष योगेश पड्यार, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष मानस देसाई, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, कार्यकारिणी सदस्य अॅड. प्रिया लोवलेकर, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित, समीर चांदोरकर, मानसी चांदोरकर यांच्यासमवेत मुख्याध्यापक राजेशकुमार गुरव, शिक्षक रवींद्र मांडवकर, मुबारक कुंभार्लीकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.