शालेय विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी : शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने झाशीची राणी लक्ष्मीबाईंना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले. झाशीच्या राणीप्रमाणे आत्मविश्वास, धाडस कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी यावेळी केले.

झाशीच्या राणीची वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे. सोबत माधव हिर्लेकर.

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईंची आज जयंती आहे. गेली काही वर्षे रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे ग्रामीण भागातील शाळेत हा कार्यक्रम करण्यात येतो. आज रत्नागिरी तालुक्यातील गोळप शिरंबाड येथील शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि गोळप ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश काळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, गोळप गावात सात शाळा असून विद्यार्थ्यांनी व्यक्त होण्याकरिता दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. यातून विद्यार्थ्यांना सभाधीटपणा येतो. विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे कार्यही अतुलनीय आहे. तिची वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची इच्छाशक्ती, आत्मविश्वास, धाडस या गुणांचा आदर्श लहान वयापासूनच विद्यार्थ्यांनी घ्यावा. भरपूर वाचन असेल तर अनेक गोष्टी कळतात. धाडस असेल तर अनेक गोष्टी करता येतात, संधीचा फायदा समाजासाठी कसा करता येईल. गावाला, देशाला योगदान करता येईल, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.

कार्यक्रमात बोलताना ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे. सोबत मान्यवर.

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले, संघातर्फे राणी लक्ष्माबाईंच्या नावाने क्रीडा क्षेत्रातील युवतींना पुरस्कार दिला जातो. ग्रामीण भागातील शाळेत जाऊन कार्यक्रम, शाळेला पुस्तकांची मदत, राणीच्या चरित्रपुस्तकाचे वितरण केले जाते. कार्यक्रमाला कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचेही सहकार्य लाभते. कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. गावातील शाळांमध्ये आदरातिथ्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह भरपूर असतो. गोळप शिरंबाड शाळेची माहिती घेतली असता शाळेने चौफेर प्रगती केली आहे.

संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे यांनी विद्यार्थ्यांना राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाची गोष्ट अतिशय ओघवत्या शैलीत सांगितली. मुख्याध्यापिका वृषाली हेळेकर यांनी लक्ष्मीबाईंच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सुट्टी असूनही लक्ष्मीबाईंच्या जयंतीदिनी प्रेरणा मिळण्याकरिता विद्यार्थी शाळेत कार्यक्रमाला उत्साहाने आल्याचे सांगितले. एका विद्यार्थिनीने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.

कार्यक्रमात झाशीच्या राणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राणीच्या जीवनचरित्राविषयी भाषणे केली. शाळेत प्रथमच असा कार्यक्रम झाल्यामुळे शिक्षक, पालकांचा उत्साह दुणावला. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून कार्यक्रम नियमानुसार करण्यात आला. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेणारी चित्रफित या वेळी दाखवण्यात आली.

कार्यक्रमात संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य मानस देसाई, सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई, शिरंबाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर तोसकर, उपाध्यक्ष संतोष घाणेकर, महिला सदस्य उपस्थित होत्या. शिक्षक उल्हास कुलकर्णी यांनी आभार मानले.

संघाने अर्पिता आंग्रे, स्वरा घाणेकर, रुद्र घाणेकर, तन्वी घाणेकर, गार्गी आंग्रे, आर्या आंग्रे, सृष्टी घाणेकर, रविलाल निषाद, धनश्री आंग्रे, आर्यन तोसकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. बीडीएस परीक्षेतील गुणवंत तन्वी घाणेकर, रुद्र घाणेकर, गार्गी आंग्रे यांचाही सत्कार केला. संघाने शाळेसाठी दोन हजार रुपयांची देणगी दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, राणीच्या जीवनावरील पुस्तकभेट, शालेय साहित्य, राणी लक्ष्मीबाईंच्या फोटोची प्रत सुपूर्द केली.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे झाशीची राणी लक्ष्माबाई यांच्या जयंतीनिमित्त गोळप शिरंबाड शाळेत अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पदाधिकारी.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे शाळेकरिता पुस्तके आणि राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मुख्याध्यापिका वृषाली हेळेकर यांच्याकडे सुपूर्द करताना अध्यक्ष माधव हिर्लेकर

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply