मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (१३ जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत केली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुकांचा समावेश आहे.
या निवडणुकांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि २१ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार असून, विधानसभेच्या मतदार यादीत एक जुलै २०२५ रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मते द्यावे लागतील. या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली नसल्याने ही निवडणूक घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
या निवडणुकांमध्ये दोन कोटी नऊ लाख मतदार असतील आणि त्यांच्यासाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्रे कार्यरत असतील. यासाठी एक लाख २८ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले. जिल्हा परिषदेच्या ७३१ सदस्यांसाठी आणि पंचायत समितीच्या १४६२ सदस्यासाठी ही निवडणूक होणार आहे.

