Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

डॉ. आंबेडकर वाचनालयाचा रौप्य महोत्सव साहित्यिक कार्यक्रमांनी उत्साहात

Advertisements

चिपळूण : चिपळूण नगरपालिका पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून झालेल्या विविध साहित्यिक कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

चिपळूणमधील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आयत्या वेळच्या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा, बांधावरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांची मुलाखत आणि नाटककार-कवी कै. अप्पासाहेब जाधव समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन आदी साहित्यविषयक उपक्रम उत्साहात पार पडले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या या उपक्रमांना साहित्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, श्री सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष रमण डांगे, प्रा. विनायक होमकळस, मसाप चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे होते. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयत्या वेळच्या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेचे विषय आणि स्पर्धांचा विद्यार्थीक्रम चिठ्ठीद्वारे काढण्यात आला. प्लास्टिक प्रदूषण, उद्योग आणि पर्यावरण, कोकणातील देवराई, पुन्हा एक बाबासाहेब जन्मू दे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अंधश्रद्धा आणि कोकण, सुटाबुटातले बाबासाहेब आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. विनायक होमकळस, मच्छिंद्रनाथ वाटेकर, आदिती तांबे यांनी केले. मीरा पोंक्षे (प्रथम), ओमकार वेलोंडे (द्वितीय), निधी लंबाडे (तृतीय), रोजीना साबळे आणि रिद्धी चाळके (उत्तेजनार्थ) या विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा. सुहास बारटक्के, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत आणि स्पर्धा परीक्षकांच्या हस्ते झाले. सर्व बक्षिसे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रायोजित केली होती. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले, आभार धीरज वाटेकर यांनी मानले.

प्रा. सुहास बारटक्के यांची मुलाखतघेताना विलास महाडिक, विनायक ओक

प्रा. बारटक्के यांची मुलाखत
बालवाङ्मय, विनोदी कथा, ललित लेखनासाठी प्रसिद्ध असलेले साहित्यिक आणि बांधावरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांची मुलाखत विनायक ओक आणि विलास महाडिक यांनी घेतली. ३५ वर्षे प्राध्यापक म्हणून काम, आकाशवाणीवरील असंख्य कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रमासाठी लेखन केलेल्या बारटक्के सरांची ही मुलाखत खूपच खुलली. त्यांनी घरातल्या घरात सुरू केलेल्या वाचनालयाची माहितीही पुढे आली. बारटक्के यांचे आई-वडील शिक्षक होते. सहावीतल्या मुलांना ‘किशोर’ मासिकातील एक धडा शिकवताना त्यांच्या आईला खूप आनंद झाला होता. कारण तो धडा बारटक्के सरांनी लिहिलेला होता. बारटक्के यांच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी आलेल्या ‘गोनीदां’सह विविध मान्यवर साहित्यिकांच्या आठवणी या मुलाखतीतून उलगडत गेल्या.

नाटककार-कवी कै. अप्पासाहेब जाधव ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी किरण वेताळ, डॉ. मनोज वराडे, सुधीर नागले, सारिका बिवलकर, मेधा लोवलेकर यांच्यासह निमंत्रित कवी शशिकांत मोदी, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, जयश्री यादव, कुमार कोवळे, संजय गमरे, विजय कदम, केदार पाटणकर, बुद्धघोष गमरे, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, संजय कदम, राजूभाई जाधव, प्रा. संगीता जोशी, सतीश कदम आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या. संमेलनाचे सूत्रसंचालन राष्ट्रपाल सावंत यांनी केले. सर्व सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे प्रमाणपत्र, अत्तरकुपी आणि लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ कवी, भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांच्यासह वाचनालयाच्या प्राची जोशी, मंजूषा चितळे, अमित ओक, गणेश सोनवणे, ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version