‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती गणपत वाणी राज्यस्तरीय ‘समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धे’चे पारितोषिक वितरण शनिवारी (दि. २१) चिपळूणला होणार आहे.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा समारंभ होणार आहे. या सोहळ्याचे सहआयोजन ‘आपलं चिपळूण’ संस्थेने केले आहे.

बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ ही प्रसिद्ध कविता स्पर्धेसाठी देण्यात आली होती. साहित्य इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा क्रियाशील आणि अभिनव प्रयोग राबविण्यात आल्याने बृहन्महाराष्ट्रासह लंडन, इस्रायल आदी देशांतील मराठी कवींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या स्पर्धेबाबत साहित्यविश्वात विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन, त्याच्या मूळ कवितेपेक्षा पूर्णतः वेगळ्या धाटणीची नवी अभिव्यक्ती साकारत सद्यःस्थितीवर भाष्य करणे आणि चर्चित-अचर्चित समाज वास्तवाला भिडणे हे या अभिनव स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत भागवत (एअर मार्शल, निवृत्त), कन्साई नेरोलॅक पेन्टस लि. चे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव तसेच ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेते असे – अतुल नरहर देशपांडे (नाशिक), किरण वेताळ (पुणे) आणि डॉ. मनोज सूर्यकांत वराडे (मुंबई). उत्तेजनार्थ व प्रोत्साहनपर पारितोषिकांमध्ये पुणे, पालघर, रायगड, बेळगाव, लंडन, इस्रायल, बंगलोर, बडोदे, इंदूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील कवींचा समावेश असून त्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

दरम्यान, चिपळूणच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवारी दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयत्या वेळेच्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर नुकत्याच झालेल्या बांधावरच्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांच्या साहित्यिक प्रवासावरील मुलाखत, दुपारी राज्यस्तरीय कविसंमेलन आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यावेळी लोकमान्य वाचन मंदिराचा प्रतिष्ठेचा श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या साहित्यिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूणचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply