महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळ संस्थेने कर्नल सरंजामे आणि ती… हे नाटक सादर केले.
आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करणे, त्याला नशिबाची साथ मिळून ती पूर्ण होणे अथवा न होणे आणि नशिबावर अवंबून न राहता स्वप्नांच्या संधी शोधणे किंवा निर्माण करणे हा मानवी गुणधर्म आहे. याच हव्यासातून निर्माण होणारा, पैसा व प्रॉपर्टीचा मोह माणसाला कुठच्या थराला नेऊन ठेवतो, हे मांडण्याचा ‘कर्नल सरंजामे आणि ती…’ या नाटकाच्या लेखकाचा प्रयत्न आहे.
कर्नल सरंजामे आपल्या खंडाळा येथील वाड्यात एकटे असून ते त्यांना भेटायला येणाऱ्या मेरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या तरुणपणातील मालती नावाच्या त्यांच्या मैत्रिणीचीही त्यांना आठवण येते, तिला त्यांना लग्नाविषयी विचारायचे राहिले होते. आता मेरीला ते विचारायचेच, असे त्यांनी ठरवलेले असते. त्यासाठी ते मनाची तयारी करत आहेत.
कर्नल बळवंत सरंजामे हा एक सरळमार्गी मुलगा असतो. त्याला देशसेवा करायची असते. त्याने सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतलेला असतो. मालती त्याला नेहमी लायब्ररीत भेटते, पण तिला लग्नाविषयी विचारायचे ठरवूनही राहून जाते.
मेरी परिचारिका असते, एकदा कर्नलना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी मेरी त्यांना दवाखान्यात दाखल करून त्यांची सेवा करते. तेव्हापासून कर्नलना ती आवडू लागते. ती शेजारीच आणि एकटीच राहते. कर्नलच्या तब्येतीची ती नेहमी काळजी घेते.
कर्नलना भेटायला इन्स्पेक्टर दीपेन्द्र येतो. तो कर्नलच्या मित्राचा मुलगा असतो. त्याच्या वडिलांनी आत्महत्या का केली, हे जाणून घेण्यासाठी तो कर्नलना भेटतो. कर्नल दीपेन्द्रला त्याबद्दल सविस्तर सांगतात. कर्नल एवढ्या मोठ्या वाड्यात एकटेच राहतात, हे कळल्यावर कोणीतरी सोबतीला असले पाहिजे, निदान पेईंग गेस्ट ठेवा, असा सल्ला तो देतो आणि सोशल मीडियावर जाहिरात देतो.
जाहिरातीनुसार लीना नावाची मुलगी कर्नल यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला येते. लीना मुंबईची राहणारी असून खंडाळा येथे एका ऑफिसमध्ये कामाला असते. कर्नल हळूहळू तिच्यावर विश्वासून तिला घरातील सगळी कामे सांगू लागतात. त्यामुळे हल्ली तिला त्याचा त्रास वाटू लागतो.
मेरीबरोबर गप्पा मारत असताना कर्नलबद्दल आणि त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल लीनाला माहिती मिळते. मेरी तिला सांगते, ”एवढी प्रॉपर्टी असूनही कोणी वारस नाही. त्यामुळे तू त्यांची चांगली सेवा कर. कदाचित कर्नल त्यांच्या मृत्युपश्चात ही प्रॉपर्टी तुझ्या नावानेसुद्धा करतील. मात्र त्यासाठी तुला पंचवीस वर्षं थांबावं लागेल. कारण कर्नल आपण शंभर वर्षं जगणार, असं नेहमी म्हणतात.” हे एकताच लीनाची अभिलाषा जागृत होते. लवकरात लवकर शाबासकी मिळवून इस्टेट लवकर ताब्यात कशी येईल, याबाबत तिचा प्रयत्न सुरू होतो.
कर्नल नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करत असत. नियमित व्यायाम करीत. त्यांना शंभर वर्षे जगण्याची इच्छा असते. मात्र त्यांना त्यांच्या काही इच्छा पूर्ण करावयाच्या असतात. लीना त्या इच्छा कोणत्या विचारते. त्यावर कर्नल सांगतात, लडाखला जाऊन बर्फात लोळणे, प्रयागराज दर्शन, महाबलिपुरमला समुद्रस्नान, एक खून करायचा आहे व मेरीचा प्रेमाने मुका घ्यायचा आहे.
कर्नलच्या इच्छेप्रमाणे त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी लीना नियोजन करते. त्यातील तीन इच्छा पूर्ण होतात. पुढच्या दोन इच्छा पूर्ण करण्याचे लीना ठरवते. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती कर्नल यांच्या घरी पार्टी आयोजित करते. पार्टीतील एकजण लीनाशी गैरवर्तन करतो, हे पाहून कर्नल त्यांला गोळी मारतात आणि त्यांची चौथी इच्छा पूर्ण होते. लीना कर्नलच्या चार इच्छा पूर्ण झाल्याने खूष असते. ती दीपेन्द्रला फोन करून कर्नलकडून खून झाल्याचे त्याला सांगते. दीपेन्द्र येतो, कर्नलना तो सांगतो, ”तुमच्या हातून खून कसा झाला? मला तुम्हाला अटक करावी लागेल. पण उद्या सकाळपर्यंत अटक करत नाही.”
कर्नल भानावर येतात. रागाच्या भरात चुकून आपल्या हातून खून झाला, हे त्यांच्या लक्षात येते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. ते बेशुद्ध पडतात. लीना मेरीला बोलावते. त्यांना तोंडाने कृत्रिम श्वास देते. त्यातून कर्नलची पाचवी इच्छा पूर्ण होते. कर्नलना थोडा वेळ शुद्ध येते, मात्र लगेच त्यांचे प्राणोत्क्रमण होते.
दीपेन्द्रला कर्नल यांचे मृत्युपत्र सापडते. त्यात त्यांनी लिहिलेले असते, “लीना, माझं जिच्यावर प्रेम होतं, त्या मालतीची तू मुलगी आहेस हे मला मालतीचा फोटो तुझ्या खोलीत पाहून माहिती झालं होतं. माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणजे मला माझ्या मुलीसारखीच तू आहेस. म्हणून मी तुला माझ्या घरात मुक्तसंचार करायला परवानगी दिली होती. माझी सर्व इस्टेट, बंगला, फार्म हाऊस हे माझी वारसदार म्हणून मी तुझ्या नावावर करत आहे.”
लीनाला इस्टेट मिळते, मात्र आपण कर्नल यांच्यासोबत वाईट वागलो, याचा पश्चात्ताप होतो. हे नाटक लेखकाने फॅन्टसी (कल्पनाविस्तार) प्रकारातून लिहिलेले प्रहसनपर नाटक आहे.
कर्नल यांचा दिवाणखाना, गॅलरी, लायब्ररी, बाग, रस्त्यावरील झाड इत्यादी गोष्टी नेपथ्यात दाखविण्यात आल्या आहेत. प्रकाशयोजनेद्वारे त्यांचा उठावदार पद्धतीने, प्रसंगात वापर केला गेला आहे. पार्श्वसंगीतही शांत व श्रवणीय आहे.
श्रेयनामावली
संस्था – सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर
नाटक – कर्नल सरंजामे आणि ती…
लेखक – सुनील देशपांडे
दिग्दर्शक – संजय रामटेके
नेपथ्य – संकेत पगारे
प्रकाशयोजना – शिवशंकर माळोदे
संगीतयोजना – आलेख कोटरंगे
रंगभूषा – श्रीहरी दुर्गे
वेशभूषा – रत्नाकर जैन
सहायक तंत्रज्ञ – विष्णू पगारे, इरफान शेख, स्वाती चौधरी
पात्रपरिचय
कर्नल – डॉ. प्रजेश घडसे
मालती व लीना – सुमेधा श्रीरामे
दीपेंद्र – गौरव पराते
मेरी – प्रणीता चव्हान
बळवंत – योगेश भलमे
गॅग – आदर्श मास्टे
सॅम – दीपरत्न मडावी
रुची – सलोनी डाखरे
सॅक – साक्षी गुरनुले
दिनू – संजय रामटेके
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

