चिपळूण : चिपळूणमधील साहित्य संस्थांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेळ्या ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेमुळे चिपळूणचे नाव जगभर पोहोचले आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण भराठी साहित्य परिषदेची चिपळूण शाखा आणि ‘आपलं चिपळूण’ सहआयोजक असलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती राज्यस्तरीय समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धेचे दिमाखदार पारितोषिक वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. चिपळूणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गणपत वाणी’ स्पर्धेच्या आयोजकांना त्यांनी या कल्पनेसाठी धन्यवाद दिले. आपल्या वाचनात आलेल्या ‘फ्यूचर टॉक : कॉन्वर्सेशन्स अबाउट टुमारो विद टुडेज मोस्ट प्रोव्होकेटिव्ह पर्सनॅलिटीज’ या पुस्तकाचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी सांगितले की, मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद आनंददायक आहे. या अभिनव स्पर्धेचे पारितोषिक वितरण वाचनालयाच्या प्रांगणात झाला याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि चिपळूण मसापचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्यपरीक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले. ज्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते स्व. अप्पा जाधव रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय नाटककार, कवी व लेखक होते. ते एकेकाळच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय सेवानिवृत्त संघाचे माजी अध्यक्ष होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समारंभाला कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. ते विजेते असे – अतुल देशपांडे (नाशिक-ऑस्टिन), किरण वेताळ (पुणे), डॉ. मनोज वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ – विजय सातपुते (पुणे), – विजया गुळवणी (पुणे), वृंदा कुलकर्णी (पालघर), सुधीर नागले (रायगड), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), प्रोत्साहनपर – सुजाता संजय (लंडन), डेविड पेनकर (इस्रायल), शर्मिला पटवर्धन (बंगळूर), सुषमा वडाळकर (बडोदे), श्रीती राशिनकर (इंदूर), सारिका बिवलकर (रत्नागिरी), मेधा लोवलेकर (चिपळूण).


यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतीक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. ‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी काही कविता’मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. अवघ्या ४७ वर्षांचे (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वाङ्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी लोकमान्य वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रवींद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.यांच्यासह वाचनालयाच्या प्राची जोशी, मंजूषा चितळे, अमित ओक, गणेश सोनवणे, ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

