रत्नागिरी : रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सन २०२३-२४मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्ण पदक तर वनरक्षक अरविंद मांडवकर यांना रौप्य पदक जाहीर करण्यात आले आहे.




वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरून पदक बहाल करून गौरविण्यात येते. त्यानुसार ही पदके जाहीर करण्यात आली आहेत. महसूल व वन विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. श्रीमती देसाई ठाणे वन विभागात कार्यरत असताना 2023 अखेर त्यांनी 30 हून अधिक बिबट्यांची सुटका केली. जवळपास 200 हून अधिक अन्य वन्य प्राण्यांची सुटका केली आहे. अवैध तस्करी प्रकरणी 50 हून अधिक वाहने सरकारजमा केली आहेत. पडघा येथील त्यांची खैरतस्करी कारवाई मोहीम विशेष गाजली. वन्य प्राणी, विशेषत: बिबट्याविषयी त्यांनी जनजागृती मोहीम राबविली आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे.
वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांनाही त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सुवर्ण जाहीर झाले आहे. वनरक्षक श्री. मांडवकर यांना रौप्य पदक राज्य शासनाने जाहीर केले आहे.
लवकरच राज्यस्तरीय पदक निवड समितीच्या शिफारशीनुसार या अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. या बाबीची नोंद संबंधित विभाग प्रमुख, कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

