पासष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
दि. २१-११-२०२६
नाटक : प्रिय आईस…
संस्था : सन्मान प्रतिष्ठान, रत्नागिरी
श्रेयनामावली
लेखक : वसंत कानेटकर
दिग्दर्शक : प्रज्वला बागुल
पार्श्वसंगीत : भूषण बागूल
रंगभूषा : अनिल भोज्ये
वेशभूषा : निनाद पाटील
प्रकाशयोजना : संतोष नार्वेकर
नेपथ्य : महेश धालवलकर
भूमिका आणि कलावंत
बाळदादा : उल्हास पाटील
माई : निवेदिता मनचेकर
सुनील : स्वप्नील गांधी
श्रीपतराव : अनिल भोज्ये
अॅड्. महेंद्र : मिलिंद पाटील
कुसुम : नियती पाटील
अभय : अमित तोडणकर
जगू : महेश सुतार
प्रिय आईस…
घराच्या खिडकीतून बाळकृष्ण भारद्वाज (बाळदादा) हे बाहेर मैदानात खेळणाऱ्या मुलांना पाऊस येण्याची शक्यता असल्याने खेळ आवरून घरात या असे सांगत आहेत. त्यांची पत्नी माई (माया) ही त्यांचा मुलगा सुनीलला त्याचा नवीनच झालेला मित्र ‘अभय’ यालाही घरी घेऊन ये, असे सांगत असते. अभय आणि भारद्वाज कुटुंब यांची ओळख होऊन जेमतेम पंधरा दिवस झालेले असतात, पण अभयबद्दल या कुटुंबाला आपलेपणा वाटू लागतो.
सुनील एकटाच येतो, त्याला माई विचारतात, ”अभय तुझ्यासोबत का आला नाही, तो कुठे गेला?”
अभय शेजारच्या टेकडीवर तंबूत राहत असतो. तो एनसीसीचा विद्यार्थी असल्याने त्याला तंबूत राहायची सवय असते. बाळदादा म्हणतात, ”अरे, पण पावसाळ्यात कोणी तंबूत राहत नाही.” पाऊस वाढल्याने बाळदादा स्वतः गाडी घेऊन जातात व अभयला घरी आणतात. अभयच्या चांगल्या वागणुकीमुळे बाळदादा त्याला त्यांच्या गॅरेजमध्ये नोकरी देतात, तसेच घरातही आसरा देतात. माईंना तो त्यांच्या पळवून नेलेल्या दिलीप या मुलासारखा वाटतो. त्या त्याला नेहमी विचारतात, ”तू कुठून आलास? तुझे आईवडील कुठे आहेत?” इथे फ्लॅशबॅकमध्ये अभयची कहाणी सुरू होते.
कुसुम आणि अॅड. महेंद्र यादव यांचा मुलगाही लहान असताना मृत्यू पावतो. त्या धक्क्यामुळे कुसुमची मानसिक स्थिती ठीक नसल्याने अॅड. यादव हे एक बालकाश्रमातून व्यवस्थापक श्रीपतराव यांच्या मदतीने अभयला दत्तक घेतात. आज त्याचा २५वा वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त मम्मी-पप्पा (कुसुम-महेंद्र) त्याला या प्रसंगी एक महागडे घड्याळ गिफ्ट देतात. खूप मित्र नातेवाईकांना आज घरी बोलावलेले असते.
याच आनंदाच्या प्रसंगी अभयला जुना फोटोचा एक अल्बम हाती लागतो. त्यात कुसुम-महेंद्र यांचा मृत झालेला मुलगा कुमार व अभय यांचे फोटो असतात. मात्र त्यांच्या जन्मतारखांमध्ये फक्त चार महिन्यांचा फरक असल्याने अभय याबाबतीत वडिलांना विचारतो. शेवटी अभयला खरे सत्य सांगितले जाते की, अभयचे जन्मदाते आम्ही नाही. आम्ही त्याला बालकाश्रमातून दत्तक घेतले आहे.
अभयला या गोष्टीचा धक्का बसतो. कुसुम-महेंद्र यांच्याबद्दल गैरसमज करून घेतो. बालकाश्रमाचे व्यवस्थापक श्रीपतराव यांच्याकडे जन्मदात्या आईवडिलांबद्दल चौकशी करतो. मात्र त्यांनाही नीटसे आठवत नसते, सुमारे २४ वर्षांपूर्वी त्यांच्या बालकाश्रमातील सहकारी रुद्राजी दानवे याने हा मुलगा आणला होता, एवढीच माहिती त्यांना असते. अभय श्रीपतरावांना सांगतो, ”तुम्ही जितकी मिळेल तेवढी माहिती गोळा करून मला द्या.” अभय त्याच्या जन्मदात्या आईवडिलांची माहिती काढायचे ठरवतो.
कुसुम-महेंद्र अभयला समजावतात. ”आम्ही तुझे जन्मदाते नाही, पण आम्ही आई-वडिलांची माया, प्रेम द्यायला कुठे कमी पडलो? आज इतक्या वर्षांनी तुला आम्ही परके का वाटू लागलो आहोत?” मात्र अभय काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो, ”दहा हजारांत विकत घेऊन तुम्ही माझे मालक झाले आहात”, असे बोलून त्यांचा अपमान करून एक दिवस आपल्या जन्मदात्यांच्या शोधार्थ घर सोडून निघून जातो.
जन्मदात्यांविषयी काही माहिती मिळाल्याने अभय
गोव्याला बाळदादांकडे येऊन त्यांच्या गॅरेजमध्ये नोकरी करत असतो. एकदा कुसुम-महेंद्र यांच्या परिचयाच्या व्यक्तीची गाडी गोव्यात बंद पडते. ती नेमकी अभय काम करतो त्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला येते. ती व्यक्ती अभयला ओळखते. ही माहिती ते कुसुम-महेंद्र यांना देतात. त्याआधारे अभयला शोधण्यासाठी कुसुम-महेंद्र गोव्याला भारद्वाज यांच्या घरी येतात.
माईंची भेट होते, अभय सुखरूप आहे हे कळताच कुसुमच्या भावना अनावर होतात. मुलाच्या विरहाने कुसुमची परिस्थिती पाहिल्यावर माईंना त्यांच्या दिलीप या चोरीला गेलेल्या मुलाची आठवण येते. बाळदादा कुसुमला सांगतात, ”आम्ही तुमच्या भावना समजू शकतो.” मग ते त्यांच्या पळवून नेलेल्या दिलीपबद्दल कुसुमला सांगतात.
गॅरेजमधून अजय येतो. मम्मी-पप्पांना विचारतो. ”तुम्ही इथे का आलात? तुम्ही परत जा. तुमचा-माझा काही संबंध नाही.” यावर पप्पा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. तो पप्पांचा अॅड्. यादव असा एकेरी उल्लेख करून अपमान करतो. यावर कुसुम म्हणते, ”आता तू मलाही मम्मी म्हणून हाक मारायची नाही. मात्र इथे तू कोण आहेस? कशासाठी आला आहेस हे का बरं सांगितलं नाहीस? आम्ही वस्तुस्थिती सांगावी काय?” असे सांगून कुसुममाईंना बोलावते. कुसुम माईंना सांगते, ”आमचा मुलगा आमच्याकडे यायला तयार नाही, त्याला तुमच्याकडे राहायचं आहे. तो इथे राहू द्या.” त्याच्या खर्चासाठी पैसे माईंना देतात आणि निघून जातात. माईंना या सगळ्याबद्दल संशय येतो.
सुनील गॅरेजच्या कॅशमधून काही पैसे घेतो व सिगारेट ओढतो, हे माईंना कळते. त्या सुनीलला रागावतात, ही गोष्ट अयजमुळे कळल्याचे सुनील ओळखतो आणि अजयशी त्याचे भांडण होते. अजयकडून खेळाचे कोचिंग घेणे नाकारतो. अजयला सांगतो, मी या घराचा/गॅरेजचा मालक आहे, तू आश्रित आहेस. मी पैसे गॅरेजमधून घेईन. बाबा मला रागावणार नाहीत. तू आमच्यात पडू नको. मात्र तरीही अजय त्याला कोचिंग देतो व व्यसन न करण्याचा सल्ला देतो.
परिस्थिती बदलल्यामुळे अजयलाही आपल्या कुसुम-महेंद्र या आईवडिलांची आठवण यायला लागते. एकदा तो कुसुमआईला फोनही करतो. मात्र फोनवर काही न बोलता ठेवून देतो. माईंना त्याची ही घालमेल लक्षात येते. त्या त्याला मायेने जवळ घेतात. अजय सांगतो ते माझे जन्मदाते आईवडील नाहीत. त्यावर माई त्याला सांगतात, त्यांनी तुला तू दत्तक घेतलेला मुलगा आहेस, अशी जाणीव कधी करून दिली काय? अरे, जन्मदात्यांपेक्षा मानलेलं नातं काळजातून उपजलेलं असतं. ते माया ममतेने भरलेलं असतं, ते जन्माने लादलेलं नसतं, तू तुझ्या आईवडिलांकडे लवकरच जा. मात्र जाण्याअगोदर सुनीलशी असलेलं भांडण मिटवून जा.
सुनीलला एका स्पर्धेत पारितोषिक मिळते व तो घरी येतो, सुनीलही अजयचे आभार मानून त्याने दिलेल्या कोचिंगमुळे मला हे यश मिळाल्याचे मान्य करतो. दोघांतले भांडण मिटते. अजय त्याला सांगतो, तुझ्या यशाबद्दल मी तुला उद्या सकाळी एक गिफ्ट देणार आहे.
दिवाळीची सकाळ असते. बाळदादा व माई लवकर उठून सुनील व अजय यांनाही हाका मारतात. त्यांना उठवायला जातात, तर अजय हा घरात नसतो, त्याने एक पत्र लिहून ठेवलेले असते. त्यात, ”माई, मी तुझाच लहानपणी चोरीला गेलेला मुलगा दिलीप आहे, तुझ्यामुळे माझ्या कुसुमआईची महती मला कळली. माझी चूक मला उमगली. आता मी कुसुमआईकडे व महेंद्र बाबांकडे जात आहे. मी भाग्यवान आहे की, मला दोन दोन घरं व प्रेम करणारी माणसं मिळाली.”
माई, बाळदादा व सुनील यांना हे पत्र वाचून डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहतात आणि त्याच वेळी अजय पुन्हा घरी आल्यामुळे कुसुमआई व महेंद्र बाबा यांनाही खूप खूप आनंद होतो व इथेच नाटक संपते.
दत्तक मुले देणाऱ्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत, त्याठिकाणी असणाऱ्या व्यक्तींच्या अनैतिक वागण्यामुळे भविष्यात काय दुष्परिणाम होतात, यावर नाटकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे दत्तक मुले घेणाऱ्या पालकांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याचाही वस्तुपाठ मिळतो.
नेपथ्यात बाळदादा भारद्वाज यांचे घर व अॅड. महेंद्र यादव यांचे घर असे दोन भाग रंगमंचावर दाखवलेले आहेत. रंगसंगतीही उठावदार आहे. माईंचा मुलगा दिलीप याच्या चोरीचा प्रसंग, तसेच इतर प्रसंगी प्रकाशयोजनेचा वापर योग्य पद्धतीने करून प्रसंगांचे गांभीर्य वाढवले आहे. सर्व कलावंतांच्या भूमिकाही यथायोग्य झाल्या आहेत.
(नाट्यावलोकन : प्रसाद वैद्य – ९४२०१ ५५३३३)
तिकिट विक्री
₹ १५ x ३३३ = ₹ ४,९९५/-
₹ १० x १००= ₹ १०००/-
एकूण तिकीट विक्री ₹ ५,९९५/-
प्रेक्षक संख्या – अंदाजे ४५०
पुढचे नाटक (रविवार, दि. २२-११-२०२६)
ब्लेम ट्रॅप अँड गेम
लेखक-दिग्दर्शक – राजेश गोसावी
शिवस्वराज्य फाउंडेशन, लांजा




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

