वड्याचे तेल वांग्यावर

प्रशिक्षणाकरिता निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाला. प्रशिक्षणाकरिता नेमून दिलेले नियम शिक्षकांना आक्षेपार्ह वाटतात. प्रत्येक सत्रानंतर हजेरी घेणे, पाच मिनिटे विलंब झाला तरी गैरहजेरी लावणे, प्रत्येक सत्रानंतर चाचणी घेणे शिक्षक संघटनांना आक्षेपार्ह वाटते. प्रशिक्षणाला वेळेवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. मात्र ही पळवाट आहे. प्रशिक्षणाचे नियम कडक करायला शिक्षकांच्या वर्तनानेच प्रशासनाला भाग पाडले असले पाहिजे, हेही संघटनांनी लक्षात घ्यायला हवे. प्रशिक्षणाबद्दलची नाराजी व्यक्त करताना वड्याचे तेल वांग्यावर काढून काय उपयोग?

पत्रकारांच्या प्रश्नांवर कार्यशाळेचा उतारा

महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रत्नागिरीत दोन दिवसांची पत्रकार कार्यशाळा महासंचालक, संचालक या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. दीर्घ कालावधीनंतर पत्रकारांसाठी महासंचालनालयाने आयोजित केलेली कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली. दोन दिवसांच्या कार्यशाळेत मांडता येण्यासारखे विषय मांडले गेले. पत्रकारांचे प्रबोधन झाले. नवी माहिती मिळाली. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना रत्नागिरी जिल्ह्याची सैर त्या निमित्ताने झाली. रत्नागिरीतील अलीकडच्या काळातील विकासकामे त्यांना आवर्जून दाखविली गेली. उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या या कार्यशाळेने पत्रकारांच्या बाबतीत मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले. किंबहुना पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देण्याकरिता कार्यशाळेचा उतारा देण्यात आला.

आढावा बैठकांचा चुथडा

सर्वसामान्य लोकांनी अमलात आणलेले अशा तऱ्हेचे नियोजन शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर का योजले जात नाही, हा प्रश्न आहे. नाही म्हणायला आढावा बैठका घेतल्या जातात. पण त्या बैठकांमध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती, संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून बचाव एवढेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेले दिसते. वास्तविक त्यापलीकडे जाऊन विचार करायला हवा. यापूर्वी जेव्हा मे महिन्यात पाऊस पडला, त्या वर्षी पावसाळा कधी संपला, पाणीटंचाईची काय स्थिती होती, याचा अभ्यास करून नियोजन व्हायला हवे. ते न करता केवळ आढावा बैठका घेतल्या गेल्या.

आढावा बैठकांची औपचारिकता

नेहमी येणाऱ्या पावसाळ्याच्या आसपास दरवर्षी आढावा बैठकांचा पूर येतो. प्रशासनाने किंवा यंत्रणेने जी कामे जबाबदारीने करणे अपेक्षित असते, तीच कामे करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या जातात. महामार्गांच्या कामांची सद्यस्थिती, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात अनेक ठिकाणांची होणार असलेली गंभीर स्थिती अशा किती तरी त्रासदायक बाबी सर्वसामान्यांच्याही लक्षात येतात; मात्र त्याबाबतचा आढावा घेतला जात नाही, हे नागरिकांचे दुर्दैव. त्यामुळे नियमाप्रमाणे आढावा बैठकांची औपचारिकता पार पडेल. अधिकारी सुस्कारा सोडतील. नागरिकांचे हाल सुरूच राहतील. ते सारेसुद्धा पावसाळ्याप्रमाणे नेमेचि होणार आहे.

आपला दवाखाना आहे कुठे?

राज्य शासनाने वर्षभरापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही योजना सुरू केली; पण आरोग्य सेवेच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा तसा अजूनही दुर्लक्षितच आहे. आजही अत्यवस्थ रुग्णांना, अपघातग्रस्तांना अधिक उपचारांसाठी इतरत्र पाठवले जाते. नुकताच मंडणगडमध्ये एका गर्भवती मातेचा बाळासह मृत्यू झाला. उपचारांसाठी इकडेतिकडे हलवताना झालेली फरपट तिच्या जीवावर बेतली. जैतापूर आरोग्य केंद्राच्या परिसरात काही महिन्यांपूर्वी सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाला होता. हे हकनाक गेलेले बळी आहेत. आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. सत्तारूढ पक्षाचे वेगवेगळे नेते, पालकमंत्री आणि मंत्री मात्र रुग्णसेवा किती सुधारली आहे, याची आकडेवारी जाहीर करत असतात, वस्तुस्थिती फारच वेगळी असते, याचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येत असतो. म्हणूनच आपला दवाखाना योजना आहे कुठे असा प्रश्न पडतो.

मैदानवीरांना करावे लक्ष्य

तणावाची परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थिती यामध्ये सर्वसामान्य माणसे काय करू शकतात, त्यांनी काय टाळले पाहिजे, काय केले पाहिजे, कोणाशी संपर्क साधला पाहिजे, याबाबतची प्राथमिक माहिती किमान सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यादृष्टीने किनारपट्टीवरील नागरिकांना अधिक सतर्क राहणे जरूरीचे आहे. यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयांची मदत घेतली जात आहे. त्याशिवाय ही जबाबदारी अनेक तरुण मंडळी पार पाडू शकतील. तरुण मैदानवीरांना संघटित करायला हवे. त्यांना पुरेसे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांच्यामार्फत वाडी-वस्त्यांवरही जनजागरण होऊ शकते.