कोष्टी

साप्ताहिक कोकण मीडियाने २०१९च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेत मालवणमधील कमलेश गोसावी यांनी लिहिलेल्या ‘कोष्टी’ या मालवणी बोलीतील कथेला तृतीय पारितोषिक मिळाले. तीच ही कथा…

‘हुरऽऽऽ….हो…हुरऽऽऽ…हो…इलो बग.. इलो.. बा.. पेटव.. पेटव..पडलो बरा… बा… होऽऽ.’ चेव फुटल्यागत क्रिष्णा ओरडत होता.

दोन दिवसांपूर्वी पुण्याहून आलेला क्रिष्णा जाधव पारधीत हिराहिरीने भाग घेत होता. पुण्यात हॉटेलमध्ये कामाला. उपजत बुद्धिमत्ता ठासून भरलेली असल्याने बाहेरून कॉलेज करीत होता. आतापर्यंतच्या जीवनात पैशाची चणचण होती म्हणून अभ्यासासाठी अर्थशास्त्र विषय ठेवला होता. देवाची पारध म्हटल्यावर तोही खुष होता. कारण डुक्कर पडला म्हणजे शिकार झाली तर ‘कोष्टी’ मिळणार होती. त्या आशेवर तोही डब्बा बडवत होता नि बेंबीच्या देठापासून ओरडत होता.
‘ठोऽऽ’ एकच आवाज झाला. काही सेकंद संपूर्ण रानात प्रतिध्वनी उमटत राहिले. ‘पडलो रे पडलो.. येवा येवा!’ कोणीतरी ओरडला नि सगळे पाच जांभळीकडे गोळा झाले. गोळी घासून जनावर पुढे गेल्याचे स’जले नि साऱ्यांचे चेहरे पडले होते. ‘शंकर्या, कांदे फोडूक घे!’ इष्णूने हुकुम सोडला.

प्रत्येकी एक कांदा नि गुळाचा खडा वाटला गेला. हैराण झालेली भूक हातात काय आहे, हे पाहत नाही. कांद्याचा तिखटपणा नि गुळाचा गोडवा ‘हायहुय’ करीत प्रत्येक जण संपवत होता. बरकतदार, मानकारी यांना लाडू, फरसाण, कांदाभजी नि थर्मासमधून आणलेला चहा. आपल्याला मात्र गुळकांदा, हे क्रिष्ण्याला पटलं नव्हतं.

बरकतदार बंदूक घेऊन पुढे जाऊन बसणार. त्यांना गळा फाडायचा नाही ना काट्याकुट्यात ओरबडायचंय. इथे आम्ही रक्ताचा घाम करतोय तर आम्हाला गुळकांदा नि साहेबावानी वागणाऱ्या बंदूककाऱ्यांना चांगलं-चांगलं. क्रिष्णाच्या मनात अन्यायाची चीड निर्माण होत होती. डोक्यात अर्थशास्त्राचे सिद्धांत उभे राहत होते. पहिल्यापासून मूठभर लोकांच्या हाती उत्पन्नाची साधने. ते भांडवलदार बहुसंख्य श्रमिकांचे, शेतकऱ्यांचे शोषण करीत आलेत. लोकशाहीतही तेच चालू आहे. ‘क्रिष्ण्या! मेल्या, मैताक चल्ल्यासारो चल्लस कित्याक?’ सतल्याने आवाज दिला. ‘नाय, खय! आराडतंय तर. घसो सुकलो मारे, म्हणान आवाज फुटना नाय.’

‘डुकर उठाक व्हयो तर ‘कोष्टी’ गावतली, नायतर सगळा फुकट.’

‘हा.. हा.. कळला’.. म्हणत क्रिष्ण्याने मोठा कुकारा दिला. पुन्हा शांतपणे घनदाट, काटेरी रानातून वाट काढत पुढे सरकू लागला, डोक्यातील विचार सरकवत.

आमची घरे पडकी-मोडकी, घरातील भांडी फुटकी-तुटकी, कापडं माटकी-मळकी यामुळे गलिच्छ दिसणारी आमची वस्ती. यात आमचा काय दोष? पिढ्यान्पिढ्या उन्हातानात राबून काम करणाऱ्यांचा रंग काळाच असणार ना? आमच्या अडाणीपणाचा मायदा घेत प्रस्थापित शोषण करीत आलेत नि आजही करत आहेत. काटेरी घोट्याच्या वेलाने डोक्यातील सगळं अर्थशास्त्र नि समाजवाद विसरायला भाग पाडलं होतं. उजवा पाय वेलाच्या काट्यांमुळे रक्ताळला होता. वेदनेने बधिर झालेला पाय उचलत नसताही पुढे टाकावा लागत होता.. ‘कोष्टी’च्या आशेवर.

‘ठोऽऽ..ठोऽऽ’

लागोपाठ दोन बंदुकीच्या बारांनी रान हलवून टाकले होते. एक मोठा रानडुक्कर आडवा पडला होता. इष्ण्याने पिशवीतला काळा चाकू काढला नि रानडुक्कराचा उजव कान कापला. ‘उचला रे ह्येका नि देवळाच्या पाठी ठेवा, रामय्या, भरत्या.. तुमी कापूचा सामान आणा. तासाभरात इस्तावक व्हया.’

डुक्कर लवकर कापला पाहिजे, असे हुकुम त्याने दिले. कापलेला कान पिशवीत ठेवला. जो पारध करतो तो पारधीचा कान कापतो. इष्ण्याच्या माजघरात तर डुक्कराच्या कानाचे तोरण बांधलेले होते. इष्ण्या फेमस ‘बरकतदार’ होता. त्याचीच त्याला गुर्मी आली होती.

‘बोस्डीच्यानु, लग्नाचा जेवक इलास काय? कामा काय तुमचो बापूस करतलो? चांदीवड्याची पाना हाडा जावा चार टोपले! इष्ण्याची गुर्मी बसलेल्या जाधवांच्या पोरांवर शिव्यांच्या रूपात पडली.

ज्यांच्या नशिबी दोन वेळचे अन्न नाही, त्यांना असे अपमानाचे शब्द नित्याचेच. अर्थशास्त्रात काही वेगळे सांगितलेले नाही. ज्यांच्या हाती साधने ते मालक, जे साधनहीन ते मजूर. मालकाकडून कामगाराची पिळवणूक ठरलेलीच आहे. बहुसंख्य शेतकरी, मजूर, कामगार, कारागीर, दलित, शोषित, पीडित स्त्रियांचे दिवस कधी पालटणार? समाजातील ‘शोषक’ आणि ‘शोषित’ वर्ग त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागला होता. कार्लमार्क्सचा ‘वर्गसंघर्षाचा’ सिद्धांत क्रिष्ण्या आठवत होता.
रानडुक्कर सुटी झाला होता. केसाळ चांबडीच्या तुकड्यांचा ढीग, लालगुलाबी मऊ फोडींची रास, सफेद हाडांचा छोटा खच, ‘बावळी’.. रानडुक्कराचा मांडीपासूनचा मागील उजवा पाय नि उघडे डोळे असलेले शिर, असा विस्कळित होऊन पडला होता.

‘रामण्या, ती बरकतदाराची ‘बावळी’ उचल नि इष्ण्याच्या घराक पोचव. संत्या, तुया मानकाऱ्यांचे वाटे बाजूक काढ आणि रमल्या, तुया डॉक्टर, मास्तर, तलाठी भाऊंची पानां बाजूक घे!’ गावआनव्या आबांचे आदेश सुरू झाले. सातआठ किलोची ‘बावळी’ रामव्याने उचलली. किलो-दीड किलोचे मानकाऱ्यांचे ‘वाटे’ उचलले गेले. बरीच पाने गावातील कर्मचाऱ्यांनी नेली. मटणाचा ढीग जमिनीला लागू लागला. डब्बे भरू लागले. मटणाला अनेक पाय फुटताना बघून क्रिष्ण्या अस्वस्थ होत होता. चारपाच किलोच मटण शिल्लक राहिले होते.

‘आजून कोण ऱ्हवलो काय? नसात तर ‘कोष्टी’ लाऽवक घेवा!’ आपला भरलेला डब्बा शिवाय टॉवेलमध्ये बांधलेले ‘वाटे’ आवरत आबा बोलले.

‘कोष्टी’ची पाने लागू लागली. चांदीवड्याची पन्नासभर पाने ओळीत मांडली गेली. त्यावर केसाळ चांबडीचा छोटा तुकडा, मटणाच्या बारक्या दोन फोडी, हाडकाचा तुकडा काही पानांवर पडला होता. पानांवरील मटण जेमतेम दीडशे ते दोनशे ग्रॅम वजनाचे. ‘कोष्टी’ची पाने लावून झाली होती. ‘उचला, आपापली कोष्टी नि चला आपापल्या घराक’, मानकारी परब म्हणाले.

दिवसभराच्या कष्टांना मिळाली होती.. ‘कोष्टी’. त्यातही पुन्हा काही मानकारी व इतरांनी हात मारलाच. आधीच अतिरिक्त लाभ झालेल्यांना पुन्हा-पुन्हा फायदा नि राबराब राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या माथी ‘कोष्टी’सारखी वेठबिगारी. हा अन्याय क्रिष्ण्याला सहन झाला नाही. त्यातच त्याला पुन्हा ‘दास कॅपिटल’ आठवला. ‘साधनांच्या विभागणीच्या असमानतेमुळे शेवटी क्रांती होईल नि ‘शोषका’च्या विरोधात शड्डू ठोकून ‘शोषित’ वर्ग उभा राहील.’ क्रिष्ण्या ताडकन उठला. ‘ही कोष्टीची भीक माका नको, दिवसभर मेलाव आमी, तर आमका चमचोभर ताक नि तुमका गाडग्याभर लोणी? ह्यो अन्याय आसा आमच्यार!’ त्येच्या बोलण्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. जो तो कोष्टीची पाने टॉवेलमध्ये बांधत होते. ज्यांच्यासाठी तो भांडत होता, ते त्याचे जोडीदारही त्यामध्ये होते. ‘कार्ल मार्क्सच्या सिद्धांताला अपयश का आले?’ हे जणू त्याला उमजले. पराभूत झाल्यागत, तो रित्या हातांनी घरी परतत होता. ‘किष्णो माझो शेजारी आसा. राग केल्यान, किच्याट केल्यान तरी ‘कोष्टी’ त्येका देवऽक व्हयी. मिया पोचवतंय त्येका!’ असं बोलून क्रिष्ण्याच्या वाटणीची कोष्टी घेतलेल्या गणप्याचा तेलकट काळा चेहरा फेसपावडर लावल्यागत उजाळला होता. स्वत:ची नि क्रिष्ण्याची मिळून, त्याला दोन ‘कोष्टी’ची पानं मिळाली होती. स्केटिंग बांधल्यागत त्याच्या पायांची लगबग घराच्या दिशेने चालू लागली होती.

  • कमलेश विनायक गोसावी, काळसे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
    मोबाइल : ९४२१२ ३७८८७

2 comments

  1. खूप छान लेख आहे सर…. खरतर मला मालवणी समजत नाही पण प्रयत्न केला समजून घेण्याचा …आभारी आहे तुमचा असे काही चांगले वाचायला दिलात याबद्दल…
    धन्यवाद…..👍💐

  2. खूप छान असेच दर्जेदार साहित्य निर्मिती आपल्याकडून व्हावी ही सदिच्छा.
    रमेश गिरी आणि परिवार

Leave a Reply