कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा

पिंगुळीचा वेताळ व गजलक्ष्मी

वेताळ हा कोकण भागात गावाचा रक्षणकर्ता म्हणून मान्यता पावलेला दिसतो. कोकणातील पुष्कळशा गावांमधून वेताळाची लहान-मोठी मंदिरे बघायला मिळतात. काही ठिकाणी तो मुख्य देवतेच्या मंदिरातही उभा केलेला दिसतो. या वेताळ प्रतिमांबद्दल अभ्यासकाने लिहिलेला लेख….
………
भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा नेहमीच वाईट किंवा जे दुष्टात्मे असतात त्यांनी घेरलेला असतो, असा उल्लेख आपल्या साहित्यातून मिळतो. अशाच दुष्टात्म्यांपैकी एक म्हणजे वेताळ हा कोकण भागात गावाचा रक्षणकर्ता म्हणून मान्यता पावलेला दिसतो. कोकणातील पुष्कळशा गावांमधून वेताळाची लहान-मोठी मंदिरे बघायला मिळतात. काही ठिकाणी तो मुख्य देवतेच्या मंदिरातही उभा केलेला दिसतो. गावकरी ह्या वेताळाची मनोभावे पूजाही करताना दिसतात.

कोणत्याही देवतेचे मूर्तिशास्त्र समजावून घ्यायचे असेल अथवा त्या देवतेचा आकार विशिष्ट स्वरूपाचाच का असतो हे जाणून घ्यायचे असेल, तर आपल्याला त्या देवतेशी निगडित अथवा त्या देवतेसंदर्भातील कथा, दंतकथा आधी समजून घ्याव्या लागतात. वेताळासंदर्भातही अशा दंतकथा आपल्याला आपल्या जुन्या साहित्यातून बघायला मिळतात. उदाहरणच द्यायचं झालं तर शिवशतपुराण, कलिकापुराण इत्यादी. वेताळाला स्कंदाचा अनुयायी अथवा शिष्य असेही संबोधले आहे. वेताळाचे उल्लेख भागवतपुराण, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांडपुराणातही आलेले आहेत. मत्स्यपुराणात त्याला मांसभक्षक म्हटलं आहे. वेताळाची मूर्ती ही नृत्यमुद्रेत असावी आणि देवाच्या पुढे प्रार्थना करणारी असावी.

इ. स. १०७०मध्ये लिहिल्या गेलेल्या कथा सरित्सागर ह्या साहित्यकृतीचा एक भाग म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची वेताळ पंचविशी होय. यामध्ये विक्रम आणि वेताळाच्या एकूण पंचवीस कथा आहेत. वेताळ स्मशानात वास्तव्य करतो. वेताळाला इतरही अनेक नावे आहेत. त्यापैकी काही अशी – आग्या वेताळ, ज्वाळा वेताळ, प्रलय वेताळ इत्यादी.

कोकण भागात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वेताळाला गावदेवाचा दर्जा दिला गेला आहे. जसे की नितकरी, बाराचा पूर्वस, मूळपुरुष इत्यादी देवदेवता.

वेताळाचा आणि कोकणचा रंजक असा संबंध आपल्याला बघायला मिळतो तो इ. स. १६७०मध्ये रघुनाथ नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या कोकण महात्म्य या पोथीमधून. या पोथीमध्ये एकूण ११८३ श्लोक आहेत. यातील सासष्टी महिमा यामध्ये लेखकाने कोकणातील देवी-देवतांचा महिमा वर्णिला आहे आणि आजगावच्या वेताळाचा महिमा वर्णिला आहे. त्याच्यापुढे जागरण, कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. त्याला नवस बोलले जात. आजही ह्या वेताळाला नवस बोलले जातात आणि ते पूर्ण झाले, की चप्पल वाहिली जाते. तो रात्री गावाबाहेर गस्त घालतो आणि म्हणून त्याच्या चपला झिजलेल्या असतात, असा श्रद्धाळूंचा ठाम विश्वास आहे.

वेताळाच्या प्रतिमा दोन प्रकारच्या दिसतात. एक सगुण आणि एक निर्गुण. पुण्यातील आणि कोकणातील बऱ्याच गावांमध्ये वेताळ ही गावदेवता म्हणून पुजली जाते. परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील वेताळाच्या प्रतिमांची स्वतःची अशी आगळीवेगळी आणि वैचित्र्यपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत. ह्या प्रतिमा मूर्तिशास्त्रीयदृष्ट्या फार उत्तम, सुबक अथवा देखण्या आहेत, असे नाही; पण तरीही प्रथमदर्शनीच त्यांची छाप आपल्या मनावर पडल्यावाचून राहत नाही. बऱ्याचदा ह्या प्रतिमांच्या अंगावर वस्त्रे दाखवलेली नसतात; पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधक अशा दागिन्यांनी त्या सजवलेल्या असतात. प्रतिमा जुनी असो अथवा नवीन, दागिने हे प्रामुख्याने दाखवलेले दिसतात. दागिन्यांमध्ये कडे, नूपुर, मुकुट, माळा, कुंडले, कमरबंध इत्यादी दागिन्यांना महत्त्व दिलेले दिसते. यज्ञोपवीत हा दागिना वेगळ्या धाटणीचा म्हणावा लागेल. हे यज्ञोपवीत कवट्या आणि मोठमोठ्या मण्यांनी मिळून बनवलेले दिसते आणि त्यांची रचना एकाआड एक अशा पद्धतीने केलेली असते. कमरबंध हादेखील एक उल्लेखनीय म्हणावा असा दागिना दिसतो. लहान आकाराच्या घंटा अंतराअंतरावर कोरलेल्या आहेत. आणि असा घंटांचा कमरबंध प्रतिमेत कोरलेला दिसतो. नवीन प्रतिमांमध्ये घंटांच्याऐवजी मोठे मणी कोरलेले दिसतात. कोकणात जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची स्थापना करतात आणि जुन्या मूर्ती विहिरीत टाकतात अथवा समुद्रात विसर्जन करण्यात येतात.

कुणकेरी येथील वेताळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणकेरी नामक गावात देवी भावईचे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये एका कोपऱ्यात वेताळाची मूर्ती ठेवली आहे. ही मूर्ती एका लहानशा चौथऱ्यावर उभी आहे आणि चौथऱ्यावर कोरीव काम आहे. पायामध्ये वैशिष्ट्यपूर्ण खडावा दाखवलेल्या आहेत. जाडजूड सोल असलेल्या अशा ह्या खडावा आहेत. त्याच्या पायामध्ये दोन प्रकारचे पैंजण दाखवलेले आहेत. त्यापैकी एक पारंपरिक पद्धतीचे नूपुर आहेत. आणि दुसरे सापाच्या आकाराचे आहेत. गळ्यामध्ये मुंडमाळा घातलेली आहे. त्यामध्ये एक शीर आणि एक मोठा मणी कोरलेला आहे. लहान आकाराच्या घंटांचा कमरपट्टा त्याच्या कमरेभोवती कोरण्यात आला आहे. ह्या कमरपट्ट्यात दोन घंटा, साखळीच्या आधाराने लटकवलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. या वेताळाच्या दोन्ही दंडांवर सर्पाच्या आकाराचे बाजूबंद कोरलेले आहेत. त्याचे खांद्यावर रुळणारे केस म्हणजे फणी असलेले नाग आहेत. त्याच्या मुकुटावरही नागाच्या फण्यांची नक्षी कोरलेली आहे. ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्नही नाहीत, तसेच भयकारीही नाहीत. ह्या मूर्तीचे डोळे प्रमाणापेक्षा मोठे असून, तोंड थोडेसे उघडे आहे आणि जीभ किंचितशी बाहेर आलेली आहे. त्याला दाढी, मिशा दाखवलेल्या असून, त्याच्या कपाळावर गंध कोरण्यात आले आहे. त्याच्या गळ्यामध्ये जाडजूड हार घातलेले आहेत. त्याच्या एका हातात वाडगा आणि एका हातात तलवार आहे. ह्या वेताळाला लोक नवस बोलतात. त्याला केळी आणि नारळ वाहतात. परंतु ह्याचा कोणताही खास अथवा स्वतंत्र असा उत्सव साजरा केला जात नाही.

ओटवणे येथील वेताळ

साधारण अशाच पद्धतीची आणखी एक वेताळाची मूर्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे ह्या गावी आहे. या मूर्तीच्या पायात खडावा नाहीत. या वेताळाच्या पायातही कुणकेरीच्या वेताळाच्या पायातील नूपुरांसारखेच एक पारंपरिक पद्धतीचे आणि एक नागाच्या आकाराचे नूपुर आहेत. याच्या गळ्यातील मुंडमाळा ठळकपणे कोरलेली दिसते. यात एक नरमुंड आणि एक मोठ्या आकाराचा मणी असे एकाआड एक कोरलेले दिसतात. हे मणी रुद्राक्षाप्रमाणे वाटतात. त्याच्याही कमरेभोवती घंटांचा कमरबंध दिसतो आणि दोन घंटा साखळीच्या साह्याने लटकवलेल्या अथवा लोंबत्या दाखवल्या आहेत. याच्याही दोन्ही दंडांवर सर्पाकृती बाजूबंद आहेत. डोक्यावर मुकुट असून, त्यावर नागफण्या कोरलेल्या आहेत. ही प्रतिमा बरीचशी कुणकेरीच्या प्रतिमेशी जुळणारी आहे. परंतु दोन्ही मूर्तींचा काळ सांगणे अवघड आहे.

नरमुंड आणि रुद्राक्षमाळा

ही भुतांची अथवा दुष्टात्म्यांची देवता म्हणून प्रामुख्याने कोकणात पूजली जाते. ही गावाची देवता असून, रात्री गावाचे रक्षण करत फिरते. काही गावांमधून ह्या देवाची पालखीही निघते. ज्या वेळी भुताने झपाटलेल्या व्यक्तीच्या अंगातील भूत काढायचे असेल, त्या वेळी मांत्रिक वेताळाला आवाहन करतो. त्या वेळी त्याला वीर या नावानेही संबोधले जाते. भक्तांमध्ये अशीही श्रद्धा बघायला मिळते, की हा देव भक्तांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतो. वेताळाची देवळे जवळजवळ भारतभर दिसून येतात. परंतु प्रामुख्याने ओडिशा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये जास्त करून आढळतात. ह्या देवतेची मूर्ती ही बहुतांशी नग्न स्वरूपात असते आणि भरपूर दागिन्यांनी मढवलेली असते. कोकणातील बऱ्याचशा गावांमधून ह्या देवतेला गावदेव म्हणूनही ओळखले जाते.

  • शिल्पा हडप, पुणे
    ई-मेल : shilpabhagwathadap@yahoo.in
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply