समस्या प्रलंबित आहे? सेवा अभियानाचा लाभ घ्या! भाजपचे आवाहन; रत्नागिरीत १२५ निवेदने सादर

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्पनेतून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेल्या सेवा अभियानांतर्गत रत्नागिरीत आज सुमारे १२५ निवेदनं स्वीकारण्यात आली. या अभियानाचे राज्य संयोजक आणि चव्हाण यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) संतोष साखरे, या अभियानाचे कोकण समन्वयक आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांच्यासह भाजपचे रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (संपूर्ण व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
भाजप कार्यकर्ते, पक्ष संघटना आणि शासकीय प्रशासन यांच्यात समन्वय साधणं, पक्षसंघटना मजबूत करणं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवणं हे या अभियानाचे उद्देश असल्याचं जठार म्हणाले. आता सर्वच पातळ्यांवर भाजपची सत्ता असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भूमिका यामागे आहे. वैयक्तिक समस्यांचे प्रश्न घेऊन प्रत्येकालाच जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांपर्यंत जाता येतंच असं नाही. म्हणून, सरकारचे प्रतिनिधीच स्वतः येऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न या अभियानातून करत आहेत. संतोष साखरे दर महिन्याला जिल्ह्यात येणार असून, त्या वेळी नागरिकांनी आपली निवेदनं लेखी स्वरूपात सादर करावीत. त्यांवर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत एक स्वतंत्र टीम तयार केली आहे, असंही जठार यांनी सांगितलं.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply