साप्ताहिक कोकण मीडियाने २०१९च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेत वसईतील सॅबी परेरा यांनी लिहिलेल्या ‘शामूइ दादय’ या सामवेदी बोलीतील कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले. तीच ही कथा…
बरेस वहरे जाले. तिगाळा मॅ आठ-नऊ वहराव हायनॅ बास. कोरेज्मा लाग्यासा होता. माइ दादय साथीआ तापाय शीक पडलोती. जुरूक जरी सलला, घरातशा घरात सयपाक, ठावभांडा ओडा जरी कऱ्या गेली तरी तिला भोवळ येतोती.
दादयनॅ माला ‘बाबू’ अही हाक मारली (मा खरा नाव सॅमसन; पण जकले माला शामू अहीस हाक माऱ्याशे. फक्त दादय माला कतॅ सॅम, कतॅ शामू, नाय तॅ, कतॅ बाबू अही हाक माऱ्याशी). मॅ दादय दरी गेलॉ अन विसारला ‘दादय तुला बरा वाटॅ नाय गा? मॅ तुये पाय शेपॉ गा?’
दादय बोयली, ‘पाय नाका रे शेपॉ. मॅलॅ रोजशा रोज शेप्याशे तरी कोडॅ? तू पण कंटाळल्या हायदा गनाय; पण बाबू मॅ तरी का करॉ. माला होशॅ नाय तीगाळास तुला तरास देते रे पुता.’
दादयशॅ तॅ मायेनॅ भरलेले शब्द आयकॉन माला जाम वाईट वाटला. मॅ रड्या लागलॉ. दादय माकुन बोयली, ‘शामू, माला माईत हाय, आख्खॉ दी काम करॉन तू खूप थकल्या-भागल्या हायदां; पण आज मॅ तुला आणखी एक काम कऱ्यादो हांगणार हाय, करदा ना बाबू ?’
‘कुहना काम? दादय, मॅ कतॅ तरी, कादो तरी तुला नाय हांगिलॅ गा?’ मॅ बोयलो.
दादयला आवट आलॉ. ती बोयली, ‘नाय रॅ बाबू, तू माला कत्येस नाय बोला नाय, इ बघ, आज जिगाळा बाबा, आपल्या भयसा दूध काढ्या बॅहॅदॅ तिगाळा भयशा पुढे खुराब ठवॉन तिआ डोख्योर हात फिरवीत ऱ्यासा हाय. मा बळॅ उभी रेवॅ नाय भूगुन. मा करता ऑडा करदा ना बाबू?’ आहा बॉलॉन दादयनॅ माव हात तिआ हातात घेट्लॉ. मायेने अन कळवळी नंदरेनॅ तिनॅ माओर बगीला.
‘दादय! भय माला ओळखॅ नाय. ती माला तडॅ उबी रेवॉन देदे ना?’ मॅ विसारला.
‘देदे ना बाबू, देदे. आपल्या भयला जकला हुमजातॅ. ती आंगा वासोरनॅ माहनू ओळखातॅ. तू अन मॅ कय वेगळे हाव गा? तू मिनजॅ मॅस नाय गा? अरे तू मा पोटसॉ गोळॉ. मॅ जहनी भोटी सॅम, तू मिनजे लानी दादय! मॅ नबळी जाले, शीक हाय ई आपल्या भयला माईत हाय’ दादय बोयली. दादयशॅ शब्द मा काळजात खोल गेले. मॅ ‘हा’ बोयलॉ.
भयसा दूध काढ्यादो बॅह्याशा आधी सुनी, पेंड, भुसॉ या खुराबाने भरलेला घमेला बाबांनॅ मा दरी दिला. मॅ ता भयशा पुढे ठवॉन तिआ डोख्यॉरनॅ, डोळ्यॉरनॅ, हिंगुटावरनॅ हात फिरव्या लागलॉ. हात फिरविता फिरविता माइ घमेल्यात नंदार गेली तॅ तडॅ ऑडॉरॉस खुराब होतॉ अन त्या खुराबाखाला तीनचार भोठे दगडगोटे ठेविलतॅ अन ती बिशारी पाड्डी भय खुराब समजॉन तॅ दगड साटीतोती अन बाबा तिआ दुध काढतोतॉ.
दुध काडॉन जाल्यॉर थोड्या वखतान मॅ दादयला विसारला. ‘दादय, भयनॅ घना दूध दिला पाय भूगुन तिला खादो घायलेल्या खुराबाखाला दगडगोटे ठविने, इ त्या मुक्या जनावराइ फसवणूक नाय गा? आपुन तिला फसवित्याव इ तिला जीगाळा कळातॅ तिगाळा तिला का वाटातॅ हायदॅ. मॅ भयशा पुढे उभी होतो पण मुद्दाम लांब डोकायतोतॉ. माला भयशा डोळ्यात डोळॅ घालॉन बघ्याशी हिंमतूस जाली नाय.’
शीकपणामुळे दादयसा तोंड उतारलोतास ता पाढरा-फटाक पडला. ती बोयली ‘शामू, बाबू, अरे भयशी अही फसवणूक करणे इ पापूस रॅ. इ मालापन कळातॅ अन बाबालापन कळातॅ. पण कऱ्यासा का! इ गरिबी, आपल्यादरनॅ का का पापे करॉन घेणार हाय इ ती सुकूरमावलीस जाणे!’ आहा बोलॉन दादयनॅ रंग उतरलेल्या अन विदुरलेल्या तांबड्या लुगड्या पदराय डोळॅ पुहीलॅ.
………

रातशे जीवने जाले. मॅ ओट्यॉरशा आथरीवर वाकळ आथरॉन निज्यादो गॅलॉ. दादय मा उह्या बॅहॉन माला थोपटतोती. थोपटता, थोपटता तिआ डोळ्यातनॅ आहू वाया लागले. ‘दादय! तुला माव राग आलॅ ना? मा बोलण्यानॅ तुला वेदना होयद्यात इ माला हुमज्या पावोता. दादय मॅ सुकलॉ.’ मॅ रडकुंडीला येवॉन बोयलॉ.
‘नाय रे बाबू, मॅ तुआवर कही रागवेनॅ? माला तुआवर रागावतास ये नाय रे सॅम!’ दादय बोयली.
ती पुढे बोयली, ‘सॅम, दोपारा आपुन आपल्या भयला फशविला त्याय तुला दुख जाले; पण तुइ सवताइ फसवणूक तुआ ध्यानात पण ये नाय. कोडॉ भोळॉ भावरतॉ हाय माव ‘सॅम बाबू!’
माला काय कळला नाय. मॅ विसारला, ‘दादय, माइ क्याई ला फसवणूक?’
दादय डोळॅ पुहीत पुहीत बोयली, ‘बाबू, आज दोपारा जिवताना, जिव्यादो केलेल्या खाऱ्या आटवनात तू खाऱ्याइ तुकडी शोधीतोतॉ. तुला कय ती खाऱ्याइ तुकडी हापडली नाय. मॅ हांगीला, घनी हिजल्यामुळे वितळले हायदॅ. तुला कय पटला नाय वाटातॅ. तू तोंड नाव्हॉन मॅ जीवतोती त्या बशीत डोकायलॉ, मा बशीतपन खाऱ्याइ तुकडी नोती…. बाबू, खरा हांगॉ गा, आपल्या घरात खाऱ्याइ एकूस तुकडी होती. हाकाळ-परवा जिव्या कऱ्यादो घरात कइस नाय. आटवनाला नुसता हुक्क्या बुंबलाव नायतॅ खाऱ्याव जुरूक वास जरी आलॉ तरी तू बरॉ जीवता इ मा गायी हाय. तेत्यान मॅ आटवनात खाऱ्याइ तुकडी टाकिताना, ती वाकाय बांधॉन रांधनात टाकिली. एक ऊकळी येता खोटी टूकॉन घेटली अन् हाकाळ-परवादो बरणीत ठवॉन दिली. कोडी वाईट हाय ना रे मॅ! यापुढे फिरॉन कत्येस मॅ आहा कऱ्याशी नाय. मा बाबुला फसवणार नाय. तुइ हप्पत! माला माफ करदा ना सॅम.’
दादयशॅ शब्द मा काळीज शीरॉन पार आतमीनॅ गेलॅ. त्या शब्दाय मा काळीज विताळला, पाझरला, जहनी हळका जाला, आन काळजाव पानी डोळ्यावाटे वाह्या लागलो.
…….
कथेचा प्रमाण मराठीत भावानुवाद
……
शामूची दादय
मी तेव्हा नऊ वर्षांचा असेन. कोरेज्माला आरंभ होणार होता. माझी दादय हिवतापाने आजारी होती. दादयला जरा चालले तरी घेरी येत होती.
दादयने ‘सॅम’ अशी हाक मारली. मी दादयजवळ गेलो व विचारले, ‘काय दादय? काय होतेय? पाय का चेपू?
दादय म्हणाली, ‘पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तूसुद्धा कंटाळला असशील हो; पण मी तरी काय करू?’
दादयचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. दादय पुन्हा म्हणाली, ‘सॅम तू दिवसभर काम करून दमतोस हो; पण आज तुला आणखी एक काम करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?’
‘कोणते काम? दादय, मी कधी तरी नाही म्हटले आहे का?’ मी म्हटले.
दादय गहिवरून म्हणाली, ‘नाही. तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, आज बाबा आपल्या म्हशीचं दूध काढायला बसतील तेव्हा म्हशीसमोर खुराब ठेवून तिच्या डोक्यावर हात फिरवत राहायचे आहे. माझ्याच्याने उभे राहवत नाही. माझ्यासाठी एवढे करशील ना तू बाळ.’ असे म्हणून दादयने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.
‘दादय! म्हैस मला ओळखत नाही. ती मला तिथे उभं राहू देईल ना?’ मी विचारले. ‘देईल हो बाळ, तिला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग! माझेच तू रूप! मी दुबळी, आजारी आहे हे आपल्या म्हशीला माहिती आहे.’ दादय म्हणाली. दादयचे शब्द माझ्या मनात खोल गेले. मी ‘हो’ म्हणालो.
म्हशीचे दूध काढायला बसण्याआधी चुनी, पेंड, भुसा या खुराबाने भरलेले घमेले बाबांनी माझ्याकडे दिले. मी ते म्हशीसमोर ठेवून तिच्या डोक्यावरून, शिंगावरून हात फिरवू लागलो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले, की घमेल्यात वरवर थोडासाच खुराब असून खाली तीन-चार मोठे दगडगोटे ठेवले आहेत व ती बिचारी म्हैस खुराब समजून ते दगड चाटत आहे व दूध देत आहे.
मागाहून मी हे दादयला विचारले. ‘म्हशीने जास्त दूध द्यावे म्हणून तिच्या खुराबाखाली दगडगोटे ठेवणे ही त्या मुक्या जनावराची फसवणूक नाही का गं?’
दादयची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली ‘सॅम, म्हशीची अशी फसवणूक करणे हे पापच हो; पण ही गरीबी, आपल्याकडून काय काय पापं करवून घेणाराय हे ती सुकूरमावलीच जाणे!’ असे म्हणून दादयने डोळ्यांना पदर लावला.
………………………
रात्रीची जेवणं झाली. मी ओट्यावरच्या आथरीवर वाकळ अंथरून झोपावयास गेलो. दादय माझ्या उशाजवळ बसून मला थोपटत होती. थोपटता, थोपटता तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘दादय! तुला माझा राग आला होय. तुला वाईट वाटले?’ असे केविलवाणे मी विचारले.
‘नाही हो बाळ. मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागावता येत नाही हो सॅम!’ दादय म्हणाली.
दादय पुढे बोलली, ‘सॅम, दुपारी आपण म्हशीच्या केलेल्या फसवणुकीने तुला दु:ख झाले; पण तुझी स्वत:ची फसवणूक तुझ्या लक्षातही येत नाही. किती भोळा आहे माझा बाळ!’
‘माझी कसली गं फसवणूक?’ मी कुतुहलाने विचारले.
दादय डोळे पुसत पुसत म्हणाली, ‘बाळ, आता जेवताना, जेवायला केलेल्या खाऱ्याच्या आटवनात तू खाऱ्याची तुकडी शोधत होतास. तुला काही ती सापडली नाही. मी म्हटले जास्त शिजल्यामुळे वितळली असेल. तू हिरमुसला होऊन माझ्या ताटात पाहिलेस, तिथेही खाऱ्याची तुकडी नव्हती. बाळ, खरं सांगू, आपल्या घरात खाऱ्याची एकच तुकडी होती. उद्या-परवा जेवायला बनवायला काहीच नाही. आटवनाला नुसता सुक्या बोंबलाचा किंवा खाऱ्याचा वास जरी आला तरी तू चांगला जेवतो हे मला ठाऊक आहे. म्हणून मी आटवनात खाऱ्याची तुकडी टाकताना, मी ती वाकाच्या दोरीला बांधून रांधनात टाकली आणि थोड्याच वेळात परत उचलून घेतली. उद्या-परवासाठी ठेवून दिली. मी कित्ती वाईट आहे ना रे! पुन्हा नाही हो मी असे करणार.’
दादयचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले.
- सॅबी परेरा, दहिसर (पश्चिम), मुंबई-६८
मोबाइल : ९९८७८ ७२५५४
ई-मेल : sabypereira@gmail.com
वा…सुंदर गोष्ट आहे. 👍👍. मराठीत दिल्या मुळे कळले