महाइन्फोकरोना : सर्व प्रकारच्या एकत्रित माहितीसाठी राज्य सरकारची वेबसाइट

मुंबई : करोना विषाणूचा संसर्ग राज्यात फैलावतो आहे, त्याप्रमाणेच अफवा, खोट्या बातम्याही समाजमाध्यमांद्वारे पसरत आहेत. म्हणूनच नागरिकांना करोनाच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या सरकारी उपाययोजनांची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढाकार घेतला आहे. महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in या वेबसाइटची निर्मिती केली आहे. येथे मराठीत सर्व माहिती उपलब्ध आहे.

कोविड -१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोविड-१९ अर्थात करोना विषाणूविषयीची खरी माहिती, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाही, करोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहिती, लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ही सर्व अधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर एकत्रितरीत्या मिळणार आहे.

जगभरासह देशात व राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्राबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर करोनाबाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागामार्फत राज्यातील जनतेची काळजी घेत आहेत. या सर्वांची माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रितीने पोहोचणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांद्वारे अनेकदा चुकीची माहिती पसरते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या वेबसाइटची निर्मिती केली आहे.

या वेबसाइटवर कोविड-१९ची सर्वसाधारण माहिती दिली आहे. हा रोग कसा होतो, करोना संसर्गापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, करोनाच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत, ही माहिती येथे आहे. करोनाबाधितांची जिल्हानिहाय रोजची आकडेवारी इन्फोग्राफिकसह येथे दिली जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय कॉल सेंटर व राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचे क्रमांकही देण्यात आले आहेत. जिल्हानिहाय हेल्पलाइनचे क्रमांकही या ठिकाणी देण्यात आले आहेत. सार्वजनिक सुविधा या विभागात प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या सोयीसुविधा केल्या आहेत, त्याची जिल्हानिहाय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘घडामोडी’ या विभागात राज्य शासनाच्या विविध विभागांनी घेतलेले निर्णय, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, मुख्यमंत्री, इतर मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदांची व बैठकांची माहिती, राज्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी आदींची माहिती देण्यात आली आहे. माध्यमांना लवकरात लवकर माहिती मिळावी, यासाठी हा विभाग वेळोवेळी अद्ययावत केला जाणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ट्विटर आणि फेसबुकवर देण्यात येणाऱ्या माहितीची लिंकही येथे देण्यात आली आहे. ‘विश्लेषण’ या विभागात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने करोना प्रादुर्भावाच्या राज्यातील स्थितीच्या विश्लेषणात्मक माहितीचा अहवाल देण्यात आला आहे. ही माहिती तेथून डाउनलोडही करता येणार आहे.

करोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’च्या खात्याची माहितीही येथे देण्यात आली असून, या खात्याचा क्यूआर कोडही येथे देण्यात आला आहे, जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल.

करोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची अधिकृत व खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी https://mahainfocorona.in या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s