करोना संसर्गाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करू शकत नसलेल्या नागरिकांना हाताशी बराच मोकळा वेळ उपलब्ध झाला. अचानक मिळालेल्या या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार पर्याय निवडले. आपल्याला ज्या विषयातील ज्ञान आहे, ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेकांना देण्याचे उपक्रमही काही जणांनी राबविले. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरीतील अभय भावे. प्रोग्रामिंग या विषयावर रोज दीड ते दोन तास मोफत ऑनलाइन क्लास घेण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे.
अभय भावे रत्नागिरीतील गद्रे इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीमध्ये सीनिअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत. प्रामुख्याने संगणकशास्त्र पदवीच्या द्वितीय वर्षाचे किंवा त्यापुढचे विद्यार्थी, तसेच प्रोग्रामिंग शिकणाऱ्या व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून भावे यांनी ३० मार्चपासून रोजी दुपारी दीड वाजता कोड कँप हा उपक्रम सुरू केला. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विषयाची थोडी पार्श्वभूमी माहिती असावी, हा त्यामागचा उद्देश आहे. १३ एप्रिलपर्यंत हे क्लास अभय भावे फेसबुक लाइव्हद्वारे घेणार आहेत. प्रोग्रामिंगमागील तीन विचारपद्धती – प्रोसिजरल पॅराडिम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिम आणि फंक्शनल पॅराडिम हा कोड कँपचा मुख्य विषय आहे. क्लासच्या शेवटी शंका-समाधानही केले जाते.
पहिल्या दिवशीच्या सत्रात प्रोग्रामिंग म्हणजे काय, या विषयाचा आढावा घेण्यात आला. तसेच, संगणक, प्रोग्रामिंग आणि गणित या विषयावर भाष्य करण्यात आले. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून, सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच प्रोग्रामिंग शिकणाऱ्या व्यक्तींपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवावी, असे आवाहन भावे यांनी केले आहे.
ज्यांना आधीची लेक्चर्स चुकली आहेत, त्या व्यक्ती अभय भावे यांच्या फेसबुक वॉलवरून लेक्चर्सचे रेकॉर्डेड लाइव्ह व्हिडिओ पाहू शकतात.
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/bhave.abhay