गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी ‘सॅनिटायझर टनेल’ बसवणार

मुंबई : करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठे, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलची उभारणी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढाकार घेऊन कमी खर्चात सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. काही राज्यांत त्याचा वापर आधीच सुरू झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

देशाच्या विविध भागांमध्ये सध्या अशा प्रकारच्या टनेलचा वापर सुरू करण्यात आला आहे. दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत असे टनेल वापरले जात आहेत. भारतीय रेल्वेकडून हरियाणा येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आली आहे. या टनेलला ‘फ्युमिगेशन टनेल’ असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही या तंत्राचा उपयोग केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यावसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पुढाकाराने या टनेलची निर्मिती करण्यात आली आहे

पाण्यात एक टक्का सोडियम हायपोक्लोराइडच्या मिसळून त्याचे मिश्रण निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते. या टनेलमधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चार ते पाच सेकंदे लागतात. त्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. या प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी १२ फूट लांबीच्या पोर्टा केबिनचा वापर केला गेला आहे.

नोझलद्वारे तयार केल्या जाणाऱ्या वाफेचे अधिक चांगले वितरण होण्यासाठी फ्लुइड फ्लो सिस्टीम अॅनसिस (ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन आणि सिम्युलेशन करण्यात आले आहे. मानवी शरीरावर याचा काही विपरीत परिणाम होतो आहे का नाही याचा शोध घेण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे.

करोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे, असे सामंत यांनी सांगितले; मात्र ज्या व्यक्तींना काही अॅलर्जी असेल, त्यांनी या टनेलमध्ये प्रवेश करणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’चे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे, प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले यांनी संशोधन करून या यंत्रणेचे डिझाइन केले आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी या चमूचे कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

(वरील फोटो सौजन्य : अमर उजाला, व्हिडिओ सौजन्य : टाइम्स नाऊ)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply