लॉकडाउनमध्ये शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे; रत्नागिरीतील तरुण प्राध्यापकाचा उपक्रम

रत्नागिरी : करोनाच्या संकटामुळे सध्या सगळेच जण देशातील लॉकडाउनचा अभूतपूर्व काळ अनुभवत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेले काही जण आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे काही जण वगळता बहुतांश नागरिकांना अचानक बराच रिकामा वेळ हाताशी मिळाला आहे. त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मार्गही शोधून काढला आहे. पुण्यात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या एका तरुण प्राध्यापकाने या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शौनक माईणकर असे या तरुण प्राध्यापकाचे नाव.

माईणकर सध्या पुण्यातील ‘बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शेअर मार्केट ट्रेडिंग आणि संबंधित विषय पुण्यातील नामवंत कॉलेजमध्ये शिकवण्याचा, तसेच प्रत्यक्ष ट्रेडिंगचा त्यांना सुमारे दोन वर्षांचा अनुभव आहे. शेअर बाजाराचे विश्लेषण हा किमान शिक्षण झालेल्या कोणालाही सहज जमण्यासारखा विषय आहे; मात्र तो विषय नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अभ्यासपूर्ण ट्रेडिंग केले तर शेअर बाजारातून आर्थिक स्वावलंबित्व मिळू शकते, असे त्यांचे मत आहे. म्हणूनच सध्या रत्नागिरीत असताना घरूनच त्यांनी या विषयाचे ऑनलाइन धडे घेण्याचे ठरवले.

झूम या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपवरून शौनक माईणकर यांनी दोन एप्रिलपासून स्टॉक टॉक या नावाने हा १० दिवसांचा कोर्स सुरू केला आहे. दररोज सायंकाळी चार वाजता हा ऑनलाइन क्लास सुरू होतो. कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व्यक्ती, आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापारी, व्यवस्थापक अशा कोणालाही हा कोर्स उपयुक्त आहे. माध्यमिक शिक्षणाएवढ्या पातळीचा गणित विषय समजणारी कोणीही ही व्यक्ती या क्लासला हजेरी लावू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. हा कोर्स सोप्या इंग्रजी भाषेतून आहे.

माईणकर यांच्या या कोर्सला चांगला प्रतिसादही मिळत असून, आतापर्यंत दर दिवशी सुमारे ४० ते ४५ व्यक्ती यात सहभागी झाल्या आहेत. कोर्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी माईणकर यांच्याशी खालील ई-मेल आयडीवर अथवा फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करायची आहे.

लॉकडाउनची आर्थिक झळ प्रत्येकालाच या ना त्या रूपाने, कमी-अधिक प्रमाणात बसली आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर पैशांची बचत, गुंतवणूक आणि संपत्तीवृद्धी यावरच प्रत्येकाचे लक्ष असेल. आपल्याकडील पैसा अभ्यासपूर्वक चांगल्या ठिकाणी गुंतवून संपत्तीवृद्धीच्या मार्गावर चालण्यासाठी या उपक्रमामुळे मदत होणार आहे. (खालील व्हिडिओतून या कोर्सविषयीची अधिक कल्पना येऊ शकेल.)

ई-मेल : shaunakmainkar@gmail.com
फेसबुक मेसेंजर : https://m.me/shaunakmainkar95

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply