मी चैतन्य मंदार घाटे (ता. लांजा, जि. रत्नागिरी), आयुर्वेदाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. करोनामुळे होणाऱ्या व्याधीकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसे पाहावे, हे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य प्रभुदेसाई यांनी कोकण मीडियामध्ये लिहिलेल्या लेखातून कळले. (तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.) या लेखात उल्लेख असलेल्या जनपदोध्वंस या विषयाची अधिक माहिती मिळवायचा मी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला नऊ वाजता दीपप्रज्ज्वलन करायला सांगितले आहे, त्यावर अनेकांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असावा, याविषयी जाणून घेण्यासाठी मी वैद्य अरुण मिश्रा (ओज आयुर्वेद, मुंबई) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. ती माहिती येथे मांडत आहे.
करोना ही संसर्गजन्य व्याधी आहे. ती आयुर्वेदीय पद्धतीनुसार कोणत्या प्रकारात घ्यायची? चरक विमानस्थान अध्याय क्रमांक तीनमध्ये व्याधी स्वरूपावरून त्याचे वर्णन जनपदोध्वंस असे केले आहे. ज्या आजारामध्ये बरेच लोक एकाच वेळी, एकाच प्रकारच्या व्याधीने पीडित होतात आणि अनेक लोकांना त्या आजारात जीव गमवावा लागतो त्याला जनपदोध्वंस असे म्हटले आहे. असे आजार का होतात, याचे कारण सांगताना चरकाचार्यांनी विशेषतः अधर्माचा उल्लेख केला आहे.
येथे कोणत्याही धर्माचा (रिलीजन) संबंध नाही. अधर्मामध्ये मानवाची स्वार्थी वृत्ती अपेक्षित आहे. या अधर्मामुळे मुख्यत्वे वायू, जल, देश (स्थान) आणि काळ या चार गोष्टी दूषित होतात. जेव्हा असे आजार पसरतात त्या वेळेला कोणती चिकित्सा करावी हेही चरकाचार्यांनी सांगितले आहे. अशा वेळी मुख्यत्वे रसायन चिकित्सा, तसेच धार्मिक चिकित्सा करावी असे सूत्रात सांगितले आहे. (येथेही धर्म म्हणजे रिलीजन अभिप्रेत नाही.)
या धार्मिक चिकित्सेत मुख्यत्वे सत्यव्रताचे पालन करणे, प्राणिमात्रांवर दया करणे, दानधर्म, देवतांची पूजा, सद्वृत्ताचे पालन, मानसिक शांती राखणे, आरोग्यासाठी हितकर अशा ठिकाणी राहणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या कथा ऐकणे, तसेच जितेंद्रिय व्यक्तींशी चर्चा करणे, सात्विक वातावरणात राहणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. आयुर्वेदात दैव व्यापाश्रय, युक्ती व्यापाश्रय आणि सत्वावजय चिकित्सा या तीन चिकित्सा पद्धती वर्णिलेल्या आहेत. यामधील युक्ती व्यापाश्रय चिकित्सेमध्ये एखाद्या व्याधीचे द्रव्याच्या साह्याने निर्मूलन करणे, तर सत्वावजय चिकित्सेमध्ये मुख्यत्वे रुग्णाचा आत्मविश्वास वाढवणे, रुग्णास धीर देणे, मानसिक आधार देणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. दैव व्यापाश्रय चिकित्सेमध्ये मंत्रपठण, धार्मिक विधी इत्यादींचे वर्णन आढळते. त्यामुळे दीपप्रज्ज्वलन करणे ही गोष्ट मुख्यत्वे सत्वावजय आणि धार्मिक चिकित्सेचा भाग आहे.
आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊ. आपण दिवा का लावायचा? पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून? तर तसे नाही. दिव्याविषयीचा श्लोक आपल्याला माहितीच आहे.
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥
या श्लोकात दिवा लावण्याचे फायदे दिलेले आहेत. दिवा लावणे हे शुभकर, कल्याणकर आहे, आरोग्यदायी आहे, धनप्राप्ती करून देणार आहे, शत्रुची शत्रुत्वाची बुद्धी नाहीशी करणार आहे, असे वर्णन आढळते; मात्र हा दिवा आरोग्यदायी कसा? आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ. आपण समजा घरात मिरचीचा धूर केला, तर सर्वांनाच ठसका लागेल, त्रास होईल; पण आपण घरात धूपाचा धूर केला, तर आपणास प्रसन्न वाटते. त्याचप्रमाणे दिव्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, हवा शुद्ध होते, त्याचप्रमाणे संसर्गजन्य रोग ज्या विषाणूमुळे पसरतात अशा विषाणूंचा नायनाट होऊ शकतो. म्हणूनच आपल्या देशात ‘हवन’ करण्याची प्रथा होती. तुपाचा दिवा लावणे अधिक श्रेयस्कर असते. सर्वांनी संघभावनेने, एकाच वेळी, एकच संकल्प मनात धरून, एकच कार्य केले तर त्या कार्याची सिद्धी लवकरच होते असे शास्त्रकार सांगतात.
माझ्या मनात या विषयी असलेल्या शंका या स्पष्टीकरणामुळे दूर झाल्या आहेत. आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊ या.
– चैतन्य मंदार घाटे
(वैद्य अरुण मिश्रा यांचा या विषयाच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)