कोरोना महामारीचा प्रतिकार आणि प्रतिबंध : आयुर्वेद काय सांगतो?

कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या सारे जग व्यापले आहे. या पार्श्वभूमीवर, या महामारीच्या प्रतिबंधासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील उपाययोजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सावंतवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी याविषयी केलेले हे मार्गदर्शन…
………..
एकाच वेळी अनेक लोकांना व्याधीचा उपसर्ग होतो, त्याला ‘जनपदोध्वंसन’ (गावेच्या गावे उजाड करू शकणारा) असे आयुर्वेदात मानले जाते. या वेळची कोविड-१९ ही महामारी याच प्रकारची आहे. वायू, जल, देश आणि काल या चार घटकांचे प्रदूषण या महामारीला कारणीभूत असते. निसर्गाचा अनिर्बंध उपभोग घेण्याच्या आणि निसर्गावर विजय (???) मिळवू इच्छिण्याच्या प्रवृत्तीमुळे वरील चार घटकांचे प्रदूषण होते.

आपल्या निसर्गाला ओरबाडण्याच्या विकृत प्रवृत्तीमुळे आणि सदाचार अजिबात सोडल्यामुळे उपरोक्त चारही घटकांची विकृती झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक नवनवीन व्याधींची निर्मिती झालेली दिसते. अशा प्रकारच्या विकृती टाळण्यासाठी आयुर्वेद या आपल्या अस्सल भारतीय वैद्यकशास्त्राने दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्ताचरण असे विविध उपक्रम आखून दिले आहेत. दुर्दैवाने ‘पुराणातली वांगी’ ‘अंधश्रद्धा’, ‘बुरसटलेल्या अशास्त्रीय पद्धती’ या नावाखाली हे सर्व उपक्रम पद्धतशीरपणे दुर्लक्षिले गेले; अन्यथा कदाचित आपण ही महामारी टाळू शकलो असतो.

‘कोरोना’ची लक्षणे सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वांना माहीत झाली आहेतच. यामध्ये बहुतेक लक्षणे श्वसननसंस्थेशी संबंधित आहेत. प्रदूषित हवेचा संबंध प्रामुख्याने श्वसननसंस्थेशी येत असल्याने असे झालेले दिसते.

आता याचा प्रतिकार कसा करता येईल, ते पाहू –

१) आहार : ताप असेल तर वैद्याच्या सल्ल्यानुसार लंघन करावे. पेज, मऊ भात, चुरमुरे, लाह्या असा अगदी हलका, ताजा (आणि गरम) आहार असावा.

२) विहार : पूर्ण विश्रांती घ्यावी.

  • पाणी कोमट प्यावे.
  • शक्य असल्यास वाळा, चंदन, नागरमोथा, पित्तपापडा, काळा वाळा यांनी सिद्ध केलेले पाणी तहान लागेल त्याच वेळी प्यावे.
  • रात्री जागरण करू नये.
  • सकाळी सूर्योदयावेळी आणि सायंकाळी सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावे.
  • सकाळी आणि संध्याकाळी धूप, वेखंड, तूप, कडुनिंब पाने, पांढरी मोहरी इत्यादी घालून घरात आणि घराच्या आवारात किमान सात दिवसांपर्यंत धूपन करावे.
  • दशविध पापकर्मे टाळावी. षड्रिपूंच्या आहारी जाऊ नये.
  • सैंधव आणि हळद घातलेल्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
  • श्वसननसंस्थेला बल‌ प्राप्त करून देण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने योगासने, प्राणायाम करावे.
  • शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे.

३) औषधे – केवळ वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी. बरे वाटल्यावर अपुनर्भवत्त्वासाठी रसायन-चिकित्सा घ्यावी.
या प्रकारे उपाय केला असता प्रत्येक रुग्णामध्ये १०० टक्के फायदा होतोच असे नाही. कारण रुग्णांची प्रतिकारक्षमता, व्याधीची तीव्रता, औषधांची अनुपलब्धता, अरिष्ट लक्षणे इत्यादी अनेक कारणांचा संबंध असतो.

प्रतिबंधक उपाय :
ज्यांना काहीही त्रास नसेल त्यांनी या महामारीपासून बचावण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी –

  • वैद्याच्या साह्याने प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.
  • कोमट दुधात हळद आणि तूप घालून सकाळीच प्यावे.
  • गवती चहा पाती, सुंठ, मिरी, ज्येष्ठमध घालून केलेला गरम काढा घ्यावा.
  • शक्य असल्यास सोन्याचे वळे टाकून उकळलेले पाणी प्यावे.
  • घरातून बाहेर पडताना कोमट केलेले खोबरेल तेल किरंगळीने नाकात व कानात फिरवावे.
  • आंघोळीपूर्वी अर्धा तास सर्व अंगाला खोबरेल/तीळ तेल लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी.
  • ‌बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुऊन कोरडे करून घरात प्रवेश करावा.
  • समाजात मिसळण्याविषयीच्या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • फ्रिझमधील अथवा बर्फ घातलेले पदार्थ टाळावेत.
  • वर निर्देश केल्याप्रमाणे घराचे नियमित धूपन करावे.
  • अग्निहोत्र केल्यास अधिक उत्तम.
  • आयुर्वेदोक्त दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्ताचरण अवश्य पाळावे.
  • ऋतुचर्योक्त पंचकर्मे नियमित करून घ्यावी.
  • अर्धशक्ती व्यायाम नियमितपणे करावा.
  • समाजमाध्यमांवरील अनधिकृत माहितीने घाबरू/घाबरवू नये. आपल्या डॉक्टरांचा सला घ्यावा.
  • श्वसनसंस्थेची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योगासने, प्राणायाम नियमितपणे आचरावे.
  • प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांची (वृद्ध आणि लहान बालके) विशेष काळजी घ्यावी.

वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई,
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१०.
मोबाइल : ९४२२४ ३५३२३

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोरोनाचा विषय कसा असावा, हे वरील वैद्य श्री. प्रभुदेसाई यांच्या लेखात वाचले . यात उल्लेख असलेल्या जनपदोध्वंसाचा उल्लेख आणि त्या विषयीची अधिक माहिती आणखी एका ठिकाणी मला मिळाली आहे. त्याचा उल्लेख मी येथे करू इच्छितो.
    सध्या कोरोना संबंधित चर्चांना सर्व स्तरांवर उधाण आले आहे. अशावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशवासीयांना एकाच वेळी दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री नऊ मिनिटे दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन केले आहे . या आवाहनावर काही अंशी टीकेची झोड उठत आहे. अशावेळी एक आयुर्वेदाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी म्हणून या दीपप्रज्वलन करण्यामागे आयुर्वेदाचा कोणता दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्यासाठी मी वैद्य अरुण मिश्रा (ओज आयुर्वेद , मुंबई ) यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याकडून उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
    सर्वप्रथम सध्याचा करोना हा जो संसर्गजन्य व्याधी आहे त्याला आयुर्वेदीय पद्धतीनुसार कोणत्या प्रकारात घ्यायचे? यावर चरक विमान स्थान अध्याय क्रमांक तीन मध्ये व्याधी स्वरूपावरून त्याचे वर्णन जनपदोध्वंस असे केले आहे. ज्या आजारामध्ये बरेच लोक एकाच वेळी, एकाच प्रकारच्या व्याधीने पीडित होतात आणि अनेक लोकांना त्या आजारात जीव गमवावा लागतो त्याला जनपदोध्वंस असे म्हटले आहे. असे आजार का होतात याचे कारण सांगताना चरकाचार्यांनी विशेषतः अधर्माचा उल्लेख केला आहे.येथे अधर्मामध्ये मानवाची स्वार्थी वृत्ती अपेक्षित आहे. या अधर्मा मुळे मुख्यत्वे वायु, जल, देश (स्थान) आणि काळ या चार गोष्टी दूषित होतात . आणि जेव्हा असे आजार पसरतात त्यावेळेला कोणती चिकित्सा करावी हेही चरकाचार्यांनी सांगितले आहे. अशावेळी मुख्यत्वे रसायन चिकित्सा तसेच धार्मिक चिकित्सा करावी असे सूत्रात सांगितले आहे.या धार्मिक चिकित्सेत मुख्यत्वे सत्य व्रताचे पालन करणे ,प्राणिमात्रांवर दया करणे ,दानधर्म, देवतांची पूजा ,सद्वृत्ताचे पालन ,मानसिक शांती राखणे, आरोग्यासाठी हितकर अशा ठिकाणी राहणे ,ब्रह्मचर्याचे पालन करणे, धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या कथा ऐकणे, तसेच जितेंद्रिय पुरुषांशी चर्चा करणे, सात्विक वातावरणात राहणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र आयुर्वेदात तीन प्रकारच्या दैव व्यापाश्रय ,युक्ती व्यापाश्रय आणि सत्वावजय चिकित्सा या तीन चिकित्सा पद्धती वर्णिलेल्या आहेत. यामधील युक्ती व्यापाश्रय चिकित्सेमध्ये एखाद्या व्याधीचे द्रव्याच्या सहाय्याने निर्मुलन करणे ; सत्वावजय चिकित्सेमध्ये मुख्यत्वे रुग्णाचा आत्मविश्वास वाढवणे, रुग्णास धीर देणे ,मानसिक आधार देणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत ;तर दैव व्यापाश्रय चिकित्सेमध्ये मंत्रपठण , धार्मिक विधी इत्यादींचे वर्णन आढळते. त्यामुळे दीप प्रज्वलन करणे ही गोष्ट मुख्यत्वे सत्वावजय आणि धार्मिक चिकित्सेचा भाग आहे.
    आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊ. आपण दिवा का लावायचा ? पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून? तर तसे नाही .आपण दिव्याचा श्लोकच पाहू.(शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
    शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥) या श्लोकात दिवा लावण्याचे फायदे दिलेले आहेत. दिवा लावणे हे शुभकर , कल्याणकर आहे ,आरोग्यदायी आहे धनप्राप्ती करून देणार आहे शत्रुची शत्रुत्वाची बुद्धी नाहीशी करणार आहे असेच तेथे वर्णन आढळते. मात्र हा दिवा आरोग्यदायी कसा? आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ. जर आपण घरात धूप केला तर आपणास प्रसन्न वाटते त्याच प्रमाणे दिव्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हवा शुद्ध होते त्याचप्रमाणे संसर्गजन्य रोग ज्या विषाणूमुळे पसरतात अशा विषाणूंचा नायनाट होतो आणि म्हणूनच आपल्या देशात ‘ हवन ‘ करण्याची प्रथा होती .
    सर्वांनी संघ भावनेने, एकाच वेळी ,एकच संकल्प मनात धरून ,एकच कार्य केले तर त्या कार्याची सिद्धी लवकरच होते असे शास्त्रकार सांगतात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊ.

Leave a Reply