एक काळ असा होता की आम्ही केवळ आम आदमी होतो. काही काळ आमच्याकडे एका विभागाची सुभेदारी दिली होती, पण त्यात तितका आनंद नव्हता. आमच्या जहागीरदाराच्या सल्ल्यानेच सारे काम करावे लागत असे. त्यापेक्षा पुन्हा एकदा आम आदमी म्हणूनच भूमिका बजावायची, असे आम्ही ठरवले. तोही काळ गेला. आता मात्र ‘शासन म्हणून’ आमच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे. तसे आमच्या परगण्याचे पालकत्व दुसऱ्या एका जहागीरदाराकडे आहे. पण वैयक्तिक कारणामुळे ते जहागिरीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ती उणीव आम्ही दूर करत आहोतच. इतकी की त्यांची कुणालाही आठवण नाही होऊ नये, इतकी जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत. किंबहुना त्यांची आठवण होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. राज्यकारभार सुरळित चालावा, एवढाच आमचा त्यातला हेतू आहे. आम्हाला दिलेल्या जहागिरीची जबाबदारी पूर्णपणे पार पाडून आम्ही या आमच्या परगण्याकडे आवर्जून लक्ष देत आहोत.
अर्थातच दोन-दोन परगण्यांची जहागिरी सांभाळणे तसे काही सोपे नाही. आम्ही शासन आहोत हे पदोपदी सांगावे लागते, पण सांगण्यापेक्षा कृतीवर आमचा भर अधिक आहे. त्यामुळे राज्याचे सारे सैनिक आपापल्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, याची पाहणी आम्हाला अधूनमधून करावी लागते. कधी आम्हाला बहिर्जी नाईक यांची आठवण होते, तर कधी शिवप्रभूंची. पण आठवणीत रममाण होण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. परगण्यांचा फेरफटका मारताना याची चुणूक आम्ही दाखवून देतो. आमच्या सध्याच्या स्वामींनी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी जिवाचे रान केले असले, तरी जागतिक पातळीवरच्या एका रोगाच्या रूपाने आपल्या देशावर परचक्र आल्यामुळे अगदी दोन परगण्यांच्या सीमासुद्धा बंद कराव्या लागल्या. त्यासाठी नेमलेले सैनिक योग्य पद्धतीने काम करत आहेत ना, हे पाहण्यासाठी खबरदार जर टाच मारुनी या शिवरायांच्या इतिहासातल्या प्रसंगावरची कविता आठवली आणि आम्ही आमच्या चक्रधरांना सीमेवर पाठवले. घुसखोरी करायचा प्रयत्न करायला लावला. पण तो यशस्वी झाला नाही. यावरूनच तिथल्या सैनिकांच्या कर्तबगारीची खात्री पटली. ते परचक्र आमच्या परगण्यापर्यंतही येऊन ठेपल्यामुळे करावा लागलेला बंदोबस्त नीट होत आहे ना, हे पाहण्यासाठी आम्ही स्वतः चक्रधर बनून नगरीचा फेरफटका मारला. त्यालाही एक कारण होते. ‘शासन म्हणून’ आम्हाला आमच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा दिला होता. परचक्र लक्षात घेऊन आम्ही त्याचा अत्यंत उदार मनाने त्याग केला. असाच एकदा फेरफटका मारताना ते परचक्र परतवून लावण्यासाठी नाक्यानाक्यावर ज्या चाचण्या कराव्या लागतात, त्या व्यवस्थित होत आहेत का, हे पाहण्यासाठी आम्ही स्वतः आमच्या स्वतःवर त्या चाचण्या करून घेतल्या.
थोडक्यात काय, तर ‘शासन म्हणून’ अनेक जबाबदाऱ्या आम्हाला पार पाडाव्या लागतात. ‘शासन म्हणून’ काही निर्णय घ्यावे लागतात. ‘शासन म्हणून’ अनेक ठिकाणी पाहणी करावी लागते. ‘शासन म्हणून’ काही आदेश द्यावे लागतात. ‘शासन म्हणून’ अनेक गोष्टींचा सातत्याने आढावा घ्यावा लागतो. ‘शासन म्हणून’ सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवावे लागते. ‘शासन म्हणून’ प्रत्येक अधिकाऱ्यावर लक्ष ठेवावे लागते. ‘शासन म्हणून’ प्रत्येक गोष्टीत लक्ष घालावे लागते. ‘शासन म्हणून’ अनेक बाबी जाहीर कराव्या लागतात. आम्ही पार पाडत असलेल्या या कामावर अनेक जण टीका करत असतीलही, पण त्याची उत्तरे द्यायला आत्ता आम्हाला अजिबात वेळ नाही. वाहनांच्या चाकापेक्षा भिंगरीचा वेग अधिक असतो का, हे आम्हाला माहीत नाही. त्याचा ‘शासन म्हणून’ आम्ही कधीतरी अभ्यास करूच. पण तूर्त तरी पायाला अक्षरशः भिंगरी लावून आम्ही सर्वत्र सतत संचार करत असतो. कारण आमच्या परगण्यात आम्हीच शासन आहोत.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३ एप्रिल २०२०)
(हा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)