रत्नागिरीत आढळला दुसरा करोनाबाधित रुग्ण; निर्बंध अधिक कडक

त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा एकमेव रुग्ण बरा होत असतानाच रत्नागिरीत आणखी एक करोनाबाधित रुग्ण आज (तीन एप्रिल २०२०) आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

दुबईतून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे मूळ गावी आलेला एक चाकरमानी करोनाबाधित झाला होता. तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तो जिल्ह्यातील पहिला करोनाबाधित रुग्ण होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तपासण्या करण्यात आल्या. त्याची प्रकृती सुधारत होती. दोन दिवसांपूर्वी त्याच्या घेतलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. जिल्ह्यातील एकमेव रुग्ण बरा झाल्यामुळे शासकीय यंत्रणा सुस्कारा सोडत असतानाच आज आणखी एका रुग्णावर शिक्कामोर्तब झाले.

पत्रकार परिषदेत माहिती देताना उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आदी

मूळचा मुंबईचा रहिवासी असलेला एक जण दिल्लीतील निजामुद्दीनमधल्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. तेथून तो आणखी चौघांसह रत्नागिरीजवळच्या राजिवडा या गावात १८ मार्च रोजी आला होता. काल (दोन एप्रिल) त्याच्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. ते करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला आज प्रयोगशाळेकडून मिळाला.

आणखी एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा प्रचंड वेगाने कामाला लागली आहे. राजिवडा गावात हा रुग्ण सापडल्याने गावाचा तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्या भागातील रहिवाशांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

त्या रुग्णासोबत असलेल्या चौघांनाही रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना आणखी १४ दिवस रुग्णालयातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या तपासण्याही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

हा रुग्ण कोचुवेली एक्स्प्रेसमधून १७ मार्च रोजी मुंबईतून रत्नागिरीला आला. या प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांपैकी चिपळूणला १०, रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्ग येथे २० जण उतरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली, मुंबई, रत्नागिरीदरम्यान हे बाधित कोठे थांबले होते, याचीदेखील चौकशी होणार आहे.

दरम्यान, गर्दी टाळण्याचे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासन वारंवार करत असूनही, काल करोनाचा रुग्ण ज्या भागात सापडला, त्या राजिवडा परिसरात मासळीच्या खरेदीसाठी आज सकाळी अनेकांनी गर्दी केली होती. खरेदी-विक्री करणारे मास्क वापरत असले, तरी सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याने धोका असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले. त्याची दखल पोलिसांनी घेतली. त्यांनी राजिवडा येथे धाव घेताच मासळी विक्रेते आणि खरेदीदार पळून गेले. त्यामुळे काही वेळापूर्वी गजबजलेला बाजार क्षणभरातच रिकामा झाला. पोलिसांनी राजिवडा मच्छी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने लिस संचालन करून नागरिकांना गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या. त्याच भागात आज करोनाचा रुग्ण आढळल्याने त्या भागात आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply