रत्नागिरीच्या ‘हेल्पिंग हँड्स’चा असाही मदतीचा हात

त्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.

संचारबंदीमुळे रत्नागिरी शहरात नागरिकांच्या फिरतीला मर्यादा आल्या आहेत. एकापाठोपाठ करोनाचे तीन रुग्ण आढळल्याने शहरातील बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. अशा स्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा घरपोच पुरवठा करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. विविध चोवीस संस्थांनी हेल्पिंग हँड्स नावाची साखळी तयार केली आहे.

शहरातील सुमारे ६५ किराणा दुकानदारांकडून दिला जाणारा माल घरोघरी नागरिकांना पोहोचविण्याचे काम या संस्थेचे स्वयंसेवक करत आहेत. नागरिकांना मदत करणे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे एवढेच काम या संस्थांकडून अपेक्षित आहे. त्यासाठीच त्यांना पासही प्रशासनातर्फे पुरविण्यात आले आहेत; मात्र केवळ वस्तू पुरविणे एवढेच आपले काम नाही तर गरजूंना तातडीच्या वेळी अन्य मदतही पुरविणे ही आपली जबाबदारी आहे, असे या स्वयंसेवकांना वाटते आणि ते ती पार पाडतात याचा अनुभव आज (आठ एप्रिल २०२०) रत्नागिरीत आला.

जिल्हा रुग्णालयातील डॉ. रश्मी आठल्ये यांच्या एक सहकारी कर्मचारी श्रीमती सोनिया नातू-पाटील अत्यावश्यक कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयात नेहमीच्या कामावर हजर झाल्या; मात्र त्यांची ॲक्टिव्हा स्कूटर वाटेत पंक्चर झाली. संचारबंदीमुळे ठराविक वेळ पेट्रोल पंप सुरू असले तरी पंपावर असलेल्या पंक्चर काढण्याच्या दुकानांसह सर्व ठिकाणची टायरची दुकाने बंद आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. याबाबत डॉ.‌ आठल्ये यांनी पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष उदय उदय लोध यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘हेल्पिंग हँड्स’मार्फत काम होऊ शकेल असे सांगितले.

मग आठल्ये यांनी ‘हेल्पिंग हँड्स’चे सुहास ठाकूरदेसाई यांच्याशी संपर्क साधला. ठाकूरदेसाई यांनी लगेच त्यांच्या संपर्कातील टायरवाल्यांशी संपर्क साधून पंक्चर काढून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर येणे-जाणे शक्य झाले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडू नये, यासाठी वेगळ्या वाटेने जाऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ. आठल्ये यांनी ‘हेल्पिंग हँड्स’ आभार मानले आहेत.

Leave a Reply