धामापूरमधील अपंगांच्या २२ कुटुंबांना अवघ्या एका व्हॉट्सअॅप मेसेजवर मदत

रत्नागिरी : व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.

करोनाविषयक संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे कोणालाही काही मदत हवी असेल, तर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले होते. त्यानुसार धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर) येथील खालच्या राऊळवाडीतील विपीन जाधव यांनी श्री. त्रिपाठी यांनी फोन केला. गावातील वेगवेगळ्या घरांमध्ये २२ अपंग राहतात. लॉकडाउनमुळे त्यांना साबणासह अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. व्यवसाय बंद असल्याने आर्थिक उत्पन्नही थांबले आहे, असे त्यांनी कळविले. श्री. त्रिपाठी यांनी हाच मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला. त्याला त्वरित प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मदतीची तत्परता दर्शविली. प्रसाद सावंत मित्रमंडळाने मदत देऊ केली. ज्यांना श्री. त्रिपाठी यापूर्वी कधीही भेटले नव्हते, त्यांनीही मदतीची तयारी दर्शविली.

समीर संसारे यांनी तातडीने गहू, तांदूळ, साखर, चहा, साबण अशा वस्तूंचे २२ संच तयार केले. हेल्पिंग हँड ग्रुपचे सदस्य राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी २५ किलो तांदूळ पुरविले. ही सारी मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी देवरूख येथील श्री. कापडी, रत्नागिरीतील भाजपचे कार्यकर्ते, तसेच अनेकांनी सहकार्य केले. निखिल देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहनाची गाडीची परवानगी मिळवून दिली. संगमेश्वरच्या तहसीलदारांना कळवून त्यांच्या मदतीची ग्वाहीही दिली. हे सर्व एका दिवसात घडले. आज (आठ एप्रिल २०२०) दुपारी दीडच्या सुमारास गरजूंना हे सर्व साहित्य पोहोच झाले.

संवेदनशीलतेने हे सारे केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशी माणसे समाजात आहेत, तोपर्यंत आपण कितीही मोठ्या आपत्तीचा सामना करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply