रत्नागिरी : जिल्ह्यातील कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज रात्री (८ एप्रिल) व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पत्रकारांना दिली. दुबईतून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात केव्हा दाखल करण्यात आले होते याविषयीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातला तो करोनाचा पहिला बळी ठरला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे तीन रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. पहिला रुग्ण शृंगारतळी (ता. गुहागर) येथून आला होता. उपचारांनंतर तो करोनामुक्त झाला आहे. दुसरा रुग्ण रत्नागिरीजवळच्या राजिवडा भागात सापडला होता. तो दिल्लीच्या मरकजमधून आला होता. तिसरा रुग्ण रत्नागिरीजवळच्या साखरतर गावात सापडला होता.
साखरतरचा रुग्ण ही बावन्न वर्षांची महिला आहे. तिने कोठेही प्रवास केला नव्हता किंवा त्याच गावात अन्य भागात दिल्लीतून आलेल्या तेरा जणांशी तिच्या जमातीचा कोणताही संबंध नव्हता. हे तुम्ही रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
कळंबणी येथील रुग्णालयात आज मरण पावलेला रुग्ण केव्हा दाखल झाला याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली नव्हती. दरम्यान, हा रुग्ण अळसुरे या गावातील असल्याचे समजते.