रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मदतीचे तीनशे हात

रत्नागिरी :  करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी काम करत आहेतच, पण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे सेवावृत्तीने तीनशे हात प्रशासनाला मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत.

रत्नागिरीत अशा २४ संस्थांची साखळी हेल्पिंग हॅण्ड्स या नावाखाली संघटितपणे काम करत आहे. या साखळीमध्ये सुमारे १५० स्वयंसेवक काम करत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, स्वराज्य संस्था, रत्नदुर्ग माउंटेनीअर्स, शिरगाव हेल्पिंग हॅण्ड ग्रुप, अभाविप, अनुलोम संस्था, प्रयत्न प्रतिष्ठान, बजरंग दल, आरएसएस, संकल्प युनिक फाउंडेशन, कीर्तनसंध्या, घाणेकर आळी मित्र मंडळ, ब्रह्मरत्न, जनजागृती संघ, वैश्य युवा, रोटरी क्लब, ऑटोमोबाइल असोसिएशन, अनमोल फाउंडेशन, जिल्हा हज कमिटी, खैरे उम्मद फाउंडेशन, पावस्कर ब्रदर्स, जिद्दी माउंटेनीरिंग, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रोटरी क्लब मिडटाऊन, राजरत्न प्रतिष्ठान, भारतरत्न प्रतिष्ठान माउंटेनीअर्स असोसिएशन अशा चोवीस संस्था हे काम करत आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील गरजूंना औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम या संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत.

शहरात संचारबंदी लागू केल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नयेत, अशा सूचना वारंवार प्रशासनातर्फे दिल्या जात आहेत. त्यातच रत्नागिरी शहरातच आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन झाली असल्यामुळे धोक्यात भर पडण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेऊन संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम गेल्या २७ मार्चपासून हेल्पिंग हँड्स या साखळीने सुरू केले. प्रशासनाने नेमून दिलेली औषधाची दुकाने आणि किराणा मालाच्या दुकानांमदून ग्राहकांनी नोंदविलेल्या यादीनुसार प्रत्येकाला त्यांचे साहित्य पोहोचविणे असे या कामाचे स्वरूप आहे. या कामाबद्दल कोणताही मोबदला ग्राहकाकडून किंवा दुकानदारांकडून घेतला जात नाही. स्वखर्चाने सर्व कार्यकर्ते स्वतःची वाहने वापरून ही सेवा करत आहेत.

आतापर्यंत दररोज सुमारे ३५ ते ४० हजाराच्या वस्तूंचा पुरवठा या संस्थेमार्फत करण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची नोंदणी ग्राहकांनी दुकानदारांकडे करावी, अशी अपेक्षा आहे. मोफत सेवा उपलब्ध करून देऊन हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनालाही भरपूर मदत करत आहे. या संस्थेच्या कोणाही व्यक्तीने आपल्याला प्रसिद्धी देऊ नये, असे सांगून सामाजिक बांधिलकीचा आणि प्रसिद्धीविना काम करण्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply