सावंतवाडी : सध्याच्या करोना संसर्गाच्या (कोविड-१९) पार्श्वभूमीवर, साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करताना सर्व प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. आवश्यकता भासल्यास आयुष डॉक्टरांचाही (एमबीबीएस व्यतिरिक्त अन्य सर्व शाखांचे वैद्यकीय व्यावसायिक) समावेश या उपाययोजनांमध्ये करावा लागू शकतो. म्हणून मुंबई येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या संस्थेकडून आयुष डॉक्टरांसाठी कोविड-१९ संदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. http://www.mcimtraining.com/ या वेबसाइटवर दिलेल्या संदर्भ साहित्याच्या आधारे अभ्यास करून परीक्षा देऊन संबंधित डॉक्टर्सनी हे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

हा उपक्रम चांगला आणि अत्यावश्यक असला, तरी त्यासाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आला आहे. या बंधनकारक असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अधिकृत पत्र https://www.mcimindia.org.in/ या वेबसाइटवर उपलब्ध असून, त्यावरील तारीख आठ एप्रिल २०२० ही आहे. नऊ एप्रिल रोजी राज्यातील नोंदणीकृत आयुष डॉक्टर्सना या संदर्भातील माहिती एसएमएसद्वारे कळवण्यात आली. हे प्रशिक्षण ११ एप्रिलपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यात म्हटले आहे. ते वेळेत पूर्ण न केल्यास कारवाई करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. याचाच अर्थ केवळ दोन ते तीन दिवसांचा अवधी यासाठी देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक आयुष डॉक्टर्स खेड्यापाड्यात सेवा करतात. त्या ठिकाणी नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. शिवाय, वयाने ज्येष्ठ असलेले अनेक डॉक्टर्स या कालावधीत संचारबंदी असल्यामुळे नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी वैद्यकीय व्यावसायिकांकडून केली जात आहे.
मुळात आताच्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून खेड्यापाड्यातील डॉक्टर सेवा देत आहेत. ती त्यांनी करणे अपेक्षितच आहे. तसेच, हे प्रशिक्षण घेऊन गरज पडेल तिथे आणखीही सेवा देण्यासही हे डॉक्टर्स तयार आहेत; मात्र एवढ्या कमी कालावधीत हे प्रशिक्षण पूर्ण करणे अवघड आहे. तसे न केल्यास कारवाईची भीती घालण्यात आली आहे. म्हणूनच, कालावधी वाढवून देण्याची मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ प्रा. डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई (वय ६९ वर्षे) यांनी प्रातिनिधिक भावना मांडणारे अनावृत पत्र संबंधितांना लिहिले आहे. त्याचा विचार करून संबंधित यंत्रणेकडून योग्य ती कार्यवाही होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. ते पत्र येथे देत आहोत.
To whomsoever it may concern,
शासनाच्या सध्याच्या प्रचलित समस्येनुरूप उचललेल्या पावलाबद्दल MCIMला मनःपूर्वक धन्यवाद… पण हा online training program अनिवार्य करण्यापूर्वी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुग्णसेवा देणाऱ्या आयुषच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणींचा विचार केला असता तर अधिक बरे झाले असते, असे वाटते –
- असे प्रशिक्षण अनिवार्य करण्यापूर्वी सर्व खेड्यापाड्यांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे का, याची खात्री करून घ्यायला हवी होती, असे मला नम्रपणे सूचित करावेसे वाटते.
- अगदी आडगावांत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य व्यावसायिकांकडे कोणत्याही नेटवर्कला इंटरनेटचा वेग E किंवा H पर्यंतच आणि अत्यंत अस्थिर स्वरूपाचा आणि अत्यल्प kbps क्षमतेचाच मिळतो. एक लिंक उघडण्यासाठी कित्येक तास घालवावे लागतात. माझाही अनुभव तसाच आहे.
- त्यामुळे बहुतेकांना पूर्ण वेग मिळविण्यासाठी किमान तीन ते पाच किलोमीटर अंतर पार करून जावे लागते.
- सध्या संचारबंदी सुरू असल्याने एवढे अंतर पार करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांची अडचण होऊ शकते.
- माझ्यासारख्या सर्व ज्येष्ठ नागरिक असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना तर घरातच राहण्याचे स्पष्ट आदेश आहेत. त्याबाबत तरी आवश्यक तसा आदेश वरील आदेशासोबतच पोलिस यंत्रणेकडे जायला हवा होता.
कृपया, शासनाला सर्व प्रकारचे सहाय्य करू इच्छिणाऱ्या आम्हा वैद्यकीय व्यावसायिकांची अडचण लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
– वैद्य मुरलीधर पु. प्रभुदेसाई, कारिवडे, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग)
(वय ६९ वर्षे)
मोबाइल : ९४२२४ ३५३२३