केवळ पंधरा दिवसांनंतरच्या भविष्यासाठी

करोना या जगभर व्यापलेल्या संसर्गजन्य आजारामुळे निर्माण झालेली भयानक परिस्थिती दिवसेंदिवस आणखी उग्र रूप धारण करत आहे. त्याचे जगभरातील आकडे क्षणाक्षणाला जगभरातल्या लोकांसमोर सोशल मीडियासह विविध माध्यमांमधून येत आहेत. लोकांनी एकत्र येण्याचे टाळणे हाच या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा एकमेव उपाय आहे. त्यासाठी जगभरात आवाहन केले जात आहे. देशभरात योग्यवेळी संचारबंदी लागू करून भारताने त्या बाबतीत आघाडी घेतली आहे. या रोगाला हरविण्यासाठी जगाचे नेतृत्व एक प्रकारे भारताकडे आल्याचे जगभरातील प्रमुख सत्तांनी भारताला दिलेल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे.

खुद्द भारतात मात्र वेगळी स्थिती आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासन सातत्याने रोगाची भयानकता आणि त्यासाठी लोकांकडून हव्या असलेल्या सहकार्याची अपेक्षा करत आहे. चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहे. मात्र हे समाधान त्यांना निर्विवादपणे मिळत नसल्याचे दररोज वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून दिसते. लोकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये, यासाठी कडक निर्बंध घातले गेले आहेत, त्याचे उल्लंघन करणार्यांनना तुलनेने सौम्य स्वरूपाची शिक्षाही दिली जात आहे. काही प्रमाणात दंड वसूल करणे, वाहनांमधील हवा सोडून देणे असे प्रयत्न प्रशासन करत आहे, जेणेकरून इतर लोक रस्त्यावर येण्यापासून परावृत्त होतील. मात्र जनतेने रोगाचे गांभीर्य ओळखलेले दिसत नाही. केवळ दंडाचे पैसे भरून काम भागणार नाही. अनावश्यक रस्त्यावर येणाऱ्यांची गर्दी अजूनही शहरी भागांमध्ये कमी झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तरी अत्यावश्यक सेवांसाठी द्यावयाच्या पासचा २५ हजारांचा कोटा केव्हाच पूर्ण झाला आहे. सोळा-सतरा लाखाची लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात २५ हजार लोकांना रस्त्यावर फिरू देण्याचा तो परवाना संचारबंदीच्या एकूण उद्देशाला छेद देणारा असला तरी त्याला पर्याय नाही. कारण वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सुविधा घरोघरी देण्यासाठी ते फिरत आहेत. पण या २५ हजारांच्या पलीकडे कितीतरी लोक संचारबंदी तोडत आहेत आणि एक प्रकारे जीवघेण्या आजाराला घरी येण्याचे निमंत्रणच देत आहेत. वारंवार वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती आणि उपाय लक्षात घेतले, तर किमान १४ दिवसांची संपर्काची साखळी तोडली गेली, तर रोग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो. तेवढा धीरही लोकांना का धरवत नाही, हा प्रश्न आहे.

सध्याची स्थिती लक्षात घेतली तर संचारबंदी या महिनाअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर संपूर्ण करोनामुक्ती हवी हवा असेल, तर तेवढा धीर लोकांनी धरायला हवा आहे. पुढचे संपूर्ण आयुष्य या पंधरा-वीस दिवसांच्या धीरावर अवलंबून आहे. रोगाच्या फैलावाची लक्षणे आणि कारणे लक्षात घेतली तर रोग वेळेत आटोक्यात आला नाही तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचे गांभीर्य अजूनही लोकांनी लक्षात घ्यायला हवे आहे. अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. हातावर पोट असलेल्या लोकांना त्याची भ्रांत अधिक आहे. त्यांचा विचार प्रशासनाने केला आहे. कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यात काही त्रुटी राहत असल्या, तर त्याला एक प्रकारे काही कारण नसताना संचारबंदीचा भंग करणारे लोकच कारणीभूत आहेत. त्यांच्या बंदोबस्ताकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागत असल्याने खरोखरी ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे आवश्यक आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला प्रशासन कमी पडत आहे. वाहने घेऊन रस्त्यावर फिरणारी आणि गरज नसताना संचारबंदीचे उल्लंघन करणारी इतर मंडळी हातावर पोट असलेली नक्कीच नाहीत. या साऱ्या मंडळींनी येत्या पंधरा-वीस दिवसांकरिता कळ सोसायला हवी. धीर धरायला हवा. त्यानंतरचे भविष्य उज्ज्वल हवे असेल, पुन्हा सर्व जनजीवन पूर्वपदावर यायला हवे असेल, तर अशा धीराची अधिक गरज आजच्या काळात आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १० एप्रिल २०२०)
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply