महापुराच्या आपत्तीतील तारणहार हेल्पिंग हॅण्ड्स करोना महामारीतही कार्यरत

रत्नागिरी : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला महापुराने विळखा घातला. त्यावेळी मदत करणारे रत्नागिरीतील हेल्पिंग हॅण्ड्स करोना महामारीच्या वेळीही कार्यरत झाले आहेत. रत्नागिरी शहर आणि परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मोफत वाहतूक करून हेल्पिंग हॅण्ड्सची साखळी आणखी मजबूत होत असतानाच समाजकार्याचा वेगळा मानदंड तयार करत आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या भयानक पूरपरिस्थितीत आपद्ग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने सहकार्यातून कामाची बीजे पेरली गेली. त्यावेळचे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पाठवायची होती. मदत करायला सगळेच उत्सुक होते. पण अशी लहान-मोठी मदतीची पार्सले एकटा दुकटा माणूस पाठवू शकत नव्हता. त्यांचे वितरण नेमक्या गरजूंमध्ये कसे होणार, हाही प्रश्नच होता. कारण त्यावेळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एक प्रकारचे नैसर्गिक लॉकडाऊन झाले होते. अशा वेळी सगळ्यांनी एकत्र यायचे आणि गोळा केलेली मदत एकत्रितपणे पाठवायची, हेच योग्य ठरले असते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांची सभा बोलावली. कल्पना मांडली. ठरलेल्या ठिकाणी मदत संकलन केंद्रे उभी राहिली. प्रत्येक वस्तूची नोंद होऊन पार्सल तयार झाली. दहा दहा टनाचे दोन ट्रक भरून मदत वस्तू रवाना झाल्या.

याच कामाच्या निमित्ताने हेल्पिंग हॅण्ड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी तयार झाली. तिची स्थापना १० ऑगस्ट २०१९ रोजी झाली. त्यामध्ये २५ ते ३० स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आपद्ग्रस्तांना विविध प्रकारची चांगलीच मदत केली. आता करोनाच्या संकटाच्या काळात विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही हेल्पिंग हॅण्ड्सकडे सहकार्याची विचारणा केली, तेव्हा हेल्पिंग हॅण्ड्सने त्वरित मदतीचा हात पुढे केला. करोनाप्रतिबंधक संचारबंदीच्या काळात रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून एकत्र आलेल्या हेल्पिंग हॅण्ड्सचे कार्यकर्ते २७ मार्च ते १४ एप्रिल या काळात एक हजार ४८५ कुटुंबांपर्यंत पोहोचले आणि जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या.

संचारबंदीमुळे कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे सातत्याने केले जात आहे. या काळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आणि औषधांसाठी घराबाहेर पडावे लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन हेल्पिंग हॅण्ड्सने रत्नागिरी शहर ते खेडशी नाका या भागात जीवनावश्यक वस्तूंचा आणि औषधांचा पुरवठा करण्याचे काम केले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या दुकानांमधून ग्राहकांनी फोनवरून यादी देऊन खरेदी केलेल्या वस्तू आणि औषधे त्या त्या ग्राहकाच्या घरी पोहोचविणे अशा स्वरूपाचे हे काम हेल्पिंग हॅण्ड्सने केले. संघटनेत सहभागी झालेल्या सदस्य संस्थेच्या स्वयंसेवकांनी एक हजार ४८५ कुटुंबांना किराणा आणि औषधे मिळून २३ लाख ५३ हजार ९८९ रुपयांच्या वस्तू घरपोच नेऊन दिल्या. आपत्काळात स्वयंसेवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, वेळेचाही विचार न करता या सेवा विनामोबदला पुरवल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आणि ज्येष्ठांची चांगलीच सोय झाली. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संचारबंदीचा काळ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तोपर्यंत हेल्पिंग हॅण्ड्स मदतकार्य करणार आहे.

Leave a Reply