एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरणने उजळविले निराधार वृद्धेचे आयुष्य

रत्नागिरी : करोनाच्या लढ्यात जनतेला घरी थांबायला सांगण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक त्या सुविधा पुरवायला प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाचाच एक भाग असलेली आणि अखंड वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेली महावितरण कंपनी किती सज्ज आहे, याची चुणूक कंपनीने दाखवून दिली आहे. एका निराधार वृद्धेला एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरण कंपनीने आपली सज्जता सिद्ध केली आहे.

रत्नागिरी शहरातील मांडवी येथे राहणाऱ्या श्रीमती अलका शिवलकर यांच्या घरी वीज नसल्याचे महावितरण कंपनीच्या जनमित्रांना आढळले. त्यांनी पदरमोड करून विद्यतीकरणाचे साहित्य तिच्या घरी पोहोचविले. परवानाधारक ठेकेदाराकडून विद्युतीकरण करून घेतले. नव्याने विजेची जोडणी देण्यासाठी आवश्यक असलेले एक हजार २०० रुपयांचे कोटेशन हार्बर शाखेचे अभियंता कौस्तुभ वसावे आणि यंत्रचालक नीलेश वेलणकर यांनी भरले. उपव्यवस्थापक संजय वैशंपायन यांनी या साऱ्या प्रक्रियेची माहिती कार्यकारी अभियंता रामलिंग बेले आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता संपत गावडे यांच्या कानावर घातली. त्यानंतर त्या दोघांनीही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे ठरविले.

दरम्यान, या कामातही एक हरकत आली होती. आपल्या घरावरून वीजवाहिनी नेऊ नये, अशी हरकत त्या वृद्धेच्या शेजाऱ्यांनी घेतली. त्यामुळे काम बंद करावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत वरिष्ठांनी दुसऱ्या एका पॉइंटवरून वीज जोडून त्यातून मार्ग काढला. काम पूर्ण होताच कार्यकारी अभियंता श्री. बेले यांनी श्रीफळ वाढवून श्रीमती शिवलकर यांचे घर उजळविले. ही सर्व प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली, हे विशेष. स्थानिक नगरसेवक बंटी कीर यांनीही महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply