उमेदच्या महिलांनी वाढवली रोजगार करू इच्छिणाऱ्यांची उमेद

रत्नागिरी : करोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी संबंधित म्हणजेच उमेदच्या महिलांनी रोजगार करू इच्छिणाऱ्यांची उमेद वाढविण्याचे काम केले आहे. या महिलांनी विविध उद्योग करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी ही माहिती दिली.

लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग बंद पडल्याने अनेकांचा रोजगार बुडाला. या परिस्थितीत गावागावांमधील महिला बचत गटांनी मास्क तयार करणे, भाजीपाला आणि कोंबड्यांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवले. जिल्ह्यातील अडीच हजार महिलांनी घरबसल्या रोजगार मिळवला. त्यातून एक कोटी सहा लाखांची उलाढाल झाली. खर्च वगळता उर्वरित उत्पन्न त्यांच्या हाती राहिले आहे. जिल्ह्याती ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत असलेल्या उमेद महिला बचत गटांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. करोना प्रतिबंधाचा प्राथमिक उपाय म्हणून मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे मास्कची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली. अशा वेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी बचत गटांकडून मास्क तयार करून घ्यायचे ठरवले. शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींना आवश्यक मास्क तयार करून त्याचा पुरवठा महिला बचत गटांनी केला. जिल्ह्यातील २६५ समूहांमधील टेलरिंग व्यवसायाशी निगडीत ३४६ सदस्यांना रोजगार मिळाला. दोन लाख ३१ हजार २७० मास्कची विक्री झाली. त्यातून ३७ लाख ९३ हजार ३६० रुपये मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मतदारसंघात नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना वाटण्यासाठी ७५ हजार मास्क खरेदी केले. इतर जिल्ह्यांमधून मास्क आणण्यापेक्षा या स्थानिक बचत गटांकडून ते बनवून घेणे सोपे झाले. त्यामुळे मास्क मुबलक प्रमाणात आणि लवकर उपलब्ध झाले. काही शासकीय ऑर्डरही मिळाल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे गावागावात भाजीची टंचाई होती. काही महिला बचत गटांनी गावातच स्टॉल उभे करून ग्रामस्थांना भाजी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील ७२७ समूहांमधील एक हजार १३७ सदस्य भाजीपाला व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांनी या काळात ७१ हजार ७४२ टन भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. त्यातून १९ लाख ८८ हजार ३४४ रुपयांची कमाई झाली, असे श्री. माने म्हणाले. कुक्कुटपालन व्यवसायही बचत गटांच्या पथ्यावर पडला. लॉकडाऊनमध्ये त्यांनी ४८ लाखाची कोंबड्यांची विक्री केली.

जिल्ह्यातील ७२ ग्राम संघांना जोखीमप्रवणता कमी करण्याच्या योजनेतून ५४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचा लाभ अपंग, वृद्ध, विधवा, परित्यक्ता, अनुसूचित जातीजमाती, दुर्धर आजारांनी पीडित व्यक्तींना मिळाला. गटांचे बचतीचे आणि कर्जाचे हप्ते घरोघरी जाऊन जमा करणे, ते बँकेतील त्यांच्या खात्यात भरणे, पैशांची गरज असलेल्या कुटुंबांना पैसे उपलब्ध करून देणे अशी कामे उपजीविका सखी आणि उद्योग सखी गटाच्या महिलांनी लॉकडाऊनच्या काळात केली. ग्रामीण भागात तयार केलेले मास्क तालुका कार्यालयामध्ये पोहोचविण्याचे कामही त्यांनी केले.

अशा तऱ्हेने उद्योगधंदे बंद पडल्याच्या काळात महिला बचत गटांमधील अडीच हजार महिलांनी एक कोटी सहा लाखांची उलाढाल करून घरबसल्या रोजगार तर मिळवलाच, पण लॉकडाऊन संपल्यानंतर रोजगार करू इच्छिणाऱ्यां सर्वांसाठी नवी उमेद दिली आहे.

Leave a Reply