गावकऱ्यांनी पाठविलेल्या धान्याचे मुंबईच्या चाकरमान्यांना वितरण

रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.

ही कथा आहे ओणी-कोंडिवळे (ता. राजापूर) येथील ग्रामस्थांची आणि त्यांच्या मुंबईतील चाकरमान्यांची. ओणी-कोंडिवळे गावातील प्रत्येक गावातील किमान एक जण मुंबई आहे. गावच्या लोकांच्या दैनंदिन खर्चासाठी दर महिन्याला मनीऑर्डर पाठविणारे मुंबईकर चाकरमानी करोना विषाणू आणि त्याचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आले. लॉकडाऊनमुळे चाकरमान्यांना स्वतःला घरातच कोंडून घ्यावे लागले. रोजंदारीवरचे काम करणाऱ्या काही जणांच्या घरात जीवनावश्यक वस्तूंचा खडखडाट झाला. गावी राहणाऱ्यांना हे समजल्यानंतर चाकरमान्यांची तसेच त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रयत्न करायचे ग्रामस्थांनी ठरविले. विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या कोंडिवळे येथील श्रीदेव विमलेश्‍वर उत्कर्ष मंडळ, मंडळाचे गावचे आणि मुंबईकर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन मदत करण्याचा निर्धार केला. त्यांच्यासह गावातील प्रमुख मंडळींनी गावातील मुंबईत राहणाऱ्या लोकांची यादी तयार केली. त्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य मुंबईतील घरात पोहोचविण्याचा विचार झाला. तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन दोन टन तांदुळ आणि एक टन डाळ असा शिधा गोळा केला. गावातील घराघरांतून हा शिधा जमविण्यात आला. त्यातून प्रत्येकी पाच किलोची ६०० पाकिटे तयार केली. ती मुंबईकर चाकरमान्यांना पाठवून दिली. मुंबईतील रेड झोन वगळून इतर भागात विखुरलेल्या मूळच्या ओणीतील ग्रामस्थांना त्याचे घरोघरी वितरण करण्यात आले.

ओणीतून धान्याची मुंबईपर्यंत वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळवून देण्यासाठी राजापूरचे आमदार राजन साळवी यांची मदत झाली.

मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे आपद्काळातील योगदान निश्‍चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असे मत श्रीदेव विमलेश्‍वर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत गोरुले यांनी व्यक्त केले.
……..

ओणीतील ग्रामस्थांनी पाठविलेले धान्य स्वीकारताना मुंबईचे चाकरमानी


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply