ऑन दी स्पॉट पिंट्यामुळे एका अपंगाला उज्ज्वल भविष्याची दिशा

रत्नागिरी : राजापूर शहरातील बंगलवाडी येथील टायर पंक्चर व्यावसायिक विवेक (पिंट्या) गुरव यांनी एका निराधार आणि अपंग व्यक्तीला माणुसकीचे दर्शन घडवून आधार देतानाच व्यवसाय सुरू करायला मदत करून स्वावलंबीही बनविले. ऑन दी स्पॉट टायर सेवा पुरविणाऱ्या आणि ऑन दी स्पॉट पिंट्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूरमधील विवेक ऊर्फ पिंट्या गुरव या कार्यकर्त्याचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरावे.

एका निराधार आणि कोल्हापूरमधून परागंदा झालेल्या, कोकणात येऊन भीक मागून पोट भरणाऱ्या अपंगाला व्यवसायाची दिशा पिंट्या गुरव यांनी दाखवल्याची एक पोस्ट व्हाट्सअप वरून आली आणि त्याचा मागोवा घेत पिंट्याची संपर्क साधला तेव्हा या प्रेरणादायी व्यक्तीशी थेट बोलता आले.

विवेक ऊर्फ पिंट्या गुरव

राजापूर येथील आयटीआयमधून १९९८ मध्ये शीट मेटलमधील डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेल्या पिंट्याला रत्नागिरीत अॅप्रेंटिसशिप करताना सामाजिक जीवनातील एका विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अॅप्रेंटिसशिप सोडावी लागली. आता कोणाच्याही हाताखाली काम करायचे नाही, तर आपण आपल्या हाताखाली काम करायला माणसे ठेवायची, असा निर्धार करून पिंट्या राजापूरला परतला. पंक्चर काढण्याच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने केरळमधल्या लोकांची संख्या अधिक असते. कोणत्याही पेट्रोल पंपावर किंवा महामार्गावर कोठेही ते लक्षात येते. असेच टायरवाले राजापूरमध्येही होते. पण दुचाकीसारखी छोटी वाहने कोठेही पंक्चर झाली, तर दुचाकीस्वारांची होणारी गैरसोय आणि हाल बघून पंक्चर काढण्याच्या व्यवसायात आपण काम करायचे, असे पिंट्याने ठरवले. याशिवाय भंगार उचलणारे, दुचाकीवरून भरपूर सामान घेऊन जाणारे भैया यांच्यापासूनही पिंट्याने स्फूर्ती घेतली, हे आणखी एक विशेष! ही माणसे जर भरपूर आणि वेगळे काम करून वेगळ्या भागातून येऊन आपल्याकडे आपले पोट भरत असतील, तर आपण आपल्या घरीच राहून वेगळे काम का करू नये, असाही विचार पंक्चरची सर्व्हिस सुरू करताना पिंट्याच्या मनात आला. गेल्या वीस वर्षांपासून त्याने ही सेवा राजापूरमध्ये सुरू केली आहे. राजापूरपासून पंचवीस ते तीस किलोमीटरपर्यंतच्या परिसरात दुचाकीपासून जेसीबीपर्यंत कोणत्याही वाहनाला ऑन दी स्पॉट पंक्चर सेवा देणे हे पिंट्याचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या हाताखाली काम करून शिकलेली सहा मराठी मुले आता पाचल, ओणी, हातिवले येथे स्थिरावली असून पंक्चरची सेवा पुरवत आहेत. आपल्या हाताखाली कामगार ठेवण्याची पिंट्याची जिद्द या पद्धतीने पुरी झाली आहे.

पोटासाठी व्यवसाय करतानाच सामाजिक अंगानेही पिंट्या काम करत आहे. राजापूरच्या ओमकार मित्र मंडळाशी तो निगडित आहे. कार्यकर्ता आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये तो सहभागी होत असतो. आताच्या करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत साहित्य वाटपाचे मोठे काम पिंट्या गुरव आणि त्याच्या मित्रमंडळींनी केले. राजापूर व्यापारी संघटना, आरएसएस अशा संघटनांनी राजापूरमधील गरजूंना आवश्यक ते साहित्य पुरविले. ते गरजूंना पोहोचविण्याचे काम पिंट्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले. टीबी पेशंट किंवा इतर काही कारणांनी खऱ्या अर्थाने घरातच लॉक झालेल्यांसाठी मी आधी काम करतो, असे त्याने सांगितले. त्यावरून त्याच्या सामाजिक कामाची तळमळ लक्षात येते.

अब्दुल

हे काम करत असतानाच अब्दुल नावाच्या एका फिरत्या भिक्षेकऱ्याकडे पिंट्याची नजर गेली. गेल्या दहा वर्षांपासून हा अब्दुल कागल (जि. कोल्हापूर) येथून घरातून तसा परागंदा झाला आहे. पोलिओमुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. कमरेखाली तो पूर्णपणे अपंग आहे. त्यामुळे त्याला हाताने गाडी फिरवूनच प्रवास करावा लागतो. आपल्या अपंगत्वाचा भार आपल्या घरच्यांवर नको, असे वाटून तो कोकणात आला. दापोली, चिपळूण आणि राजापूरमध्ये गेली दहा वर्षे अक्षरशः भीक मागत तो फिरत होता. लॉकडाऊनमुळे त्याची अवस्था कठीण झाली. तो राजापूरमध्ये अडकून पडला. एसटी स्टँडजवळ त्याला तशा भुकेल्या अवस्थेलत पाहिल्याऊनंतर पिंट्या गुरवमधला कार्यकर्ता जागा झाला. त्याने त्याला आपल्या स्वतःच्या घरी नेले. मित्रमंडळी आणि सहकारी कार्यकर्त्यांचा विरोध पत्करूनही त्याला घरीच ठेवून घेतले. त्यासाठी त्याला त्याचे काका महेश आणि आणि पत्नी सौ. विद्या गुरव यांचेही चांगले सहकार्य मिळाले. असे एखाद्याच्या घरी पडून राहणे फिरस्त्या अब्दुल्ला मानवले नसावे किंवा त्याला त्याची लाज वाटली असावी. त्याने पिंट्याकडे स्वतःला काहीतरी काम देण्याचा धोशा लावला. पिंट्याने त्याला कांदे-बटाटे विकायला प्रवृत्त केले. लॉकडाऊनच्या काळात राजापूरमध्ये येणाऱ्यांना त्याने भाजी विकली. कधी शेवग्याच्या शेंगाही विकल्या. महिनाभरात दीड टन कांद्याची विक्री अब्दुलने केली. त्यातून पाच हजार रुपयांचा फायदाही त्याला झाला. अब्दुल अपंगत्वामुळे पायाने अधू असला तरी व्यवसायात स्वतःच्या पायावर उभे करायची जिद्द पिंट्या गुरव यांनी मनाशी नक्की केली आहे. त्यात ते यशस्वी होतील.

ऑन दी स्पॉट पिंट्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवेक गुरव या राजापूरच्या कार्यकर्त्याची ही कथा म्हणूनच कोणालाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
(संपर्क क्रमांक : 8554089267, 9226973867, 7498050129)

One comment

Leave a Reply