रत्नागिरी जिल्ह्याचा धोका वाढला, करोनाबाधितांचे दशक, चौथ्या महिलेला करोना

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी दोघे करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. एक रुग्ण मंडणगड येथील, तर दुसरा संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे दोन रुग्ण आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहावर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील चौथ्या महिलेला करोना झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १९ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तो गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील होता. दुसरा रुग्ण रत्नागिरीजवळच्या राजिवडा भागातील होता. रत्नागिरीजवळच्या साखरतर येथील एकाच घरातील तिघांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी दोघी जावाजावा होत्या, तर एक सहा महिन्यांचे बालक होते. त्याच दरम्यान खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात अलसुरे गावातील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात रत्नागिरीतील दोन महिला आणि सहा महिन्यांचे बालक यांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्हा करोनामुक्त होण्याच्या आशा निर्माण झाल्या. त्याचदरम्यान गेल्या आठवड्याच्या अखेरीला आणखी दोघे रुग्ण आढळले. त्यापैकी एक महिला बामणोली (ता. संगमेश्वर) येथील होती, तर पुरुष रुग्ण खांदाटपाली (ता. चिपळूण) येथील होता.

आज आढळलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आले आहेत. त्यापैकी मंडणगड तालुक्यातील तिडे गावचा रुग्ण चालत गावाकडे निघाला होता. त्याला मंडणगड येथे ताब्यात घेऊन मंडणगडच्या ग्रामीण रुग्णालयात संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दुसरा रुग्ण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील महिला आहे. तिला रत्नागिरीच्या जिल्हा करोना रुग्णालयात आधीच दाखल करण्यात आले आहे.

आजच्या दोन रुग्णांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अन्य रुग्णांमध्ये सहा महिन्यांच्या बालकासह सहा पुरुषांचा समावेश आहे. आज आढळलेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील चौथी करोनाबाधित महिला आहे.

एकीकडे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात सवलती ४ मेपासून मिळण्याची शक्यता असताना जिल्ह्यात चार करोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संस्थात्मक क्वॉरंटाइन असलेल्या १८७ जणांच्या नमुन्याचा अहवाल मिरजेच्या प्रयोगशाळेकडून यायचा आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढली तर करोनाविषयक निकषांनुसार रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जाण्याऐवजी त्याची वाटचाल रेड झोनकडे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply