रत्नागिरीत आढळले दोन नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत काल रात्री (ता. १ मे) दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.

चिपळूण आणि संगमेश्वर येथे प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला आहे. चिपळूण येथील रुग्ण मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातून आला आहे, तर संगमेश्वरमध्ये आढळलेला रुग्ण ठाण्यातून आला आहे. या दोन्ही रुग्णांचे अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाईकांच्या स्वॅबचे नमुने घेतले जात आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नव्याने आढळलेल्या दोन रुग्णांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची आतापर्यंतची करोनाबाधितांची संख्या आठ झाली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. इतर पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, करोनाबाधित रुग्ण आढळले म्हणून कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. करोना हे जागतिक संकट असून त्यापासून घाबरून जाऊन चालणार नाही. आता त्याचाही स्वीकार केला पाहिजे. मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असून कोकणातील अनेक चाकरमानी तेथे राहतात. तेथील असुरक्षित वातावरणामुळे त्यांना कोकणात यावयाचे आहे. त्यांना कोकणात आणताना योग्य ती खबरदारी प्रशासन घेणार असून स्थानिक नागरिकांनीही मुंबई-पुण्यातून येणाऱ्या आपल्या चाकरमान्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत करायला हवे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवरून केलेल्या व्हिडीओ संदेशातून केले आहे.

चाकरमान्यांचे स्वागत करण्याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलेले आवाहन
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply